सुवर्णा धानोरकर
मुलींवरचे बलात्कार, छेडछाड थांबणारयं का डीपी ठेऊन आणि मेणबत्या लावून? जे ठोस करणं आवश्यक आहे ते करुया. ज्या ज्या स्त्रीला मुलगा आहे तिने त्याला स्त्रीचा सन्मान करणं शिकवायला हवं. मेणबत्त्या हातात घेऊन मोर्चे काढणारे किती पुरुष धुतल्या तांदळाचे असतील? त्या गर्दीतल्या पुरुषांच्या नजरा भिरभिरत नसतील कशावरून? भयंकर म्हणजे त्या मोर्चात चालतानाही तिथल्या महिला, मुलींकडे बघून त्याचं मन चाळवत नसेल कशावरून...? मेणबत्त्या घेऊन काहीही होत नाही. मेणबत्या हातात घेतल्यानं विकृताच्या मनातली विकृती जाणार का? तसं असेल तर सतत मेणबत्त्या हातात घ्याव्या. ती विकृती ठेचायची असेल तर मुलींनाही पालकांनी खूप सक्षम बनवायला हवं.
सुरुवात नवऱ्यापासून करायला हवी. नवऱ्यानेच घरातल्या स्त्रिचा मान राखला पाहिजे. तरच घरातली मुलं स्त्रिचा मान राखणं शिकतील. स्त्री म्हणून आपणही योग्य वागतो का, हे स्वत:ला विचारायला हवं. कुठे मुलीची छेड काढली की स्त्री म्हणून आपण जातो का मदतीला की मग त्या मुलीला दोष देतो, तिचीच चुक असेल असं शंभरातल्या ९९ स्त्रिया थेट बोलून जातात. का? कारण आपल्या संस्कारातच त्याचं मुळ दडलंय. आपल्यावर संस्कारच झालेयत काहीही झालं तरी चूक मुलीचीच. तिने तोकडे कपडे घातले म्हणून छेड काढली, ती सुंदर दिसते म्हणून छेड काढली, तिनेच त्याला उकसवलं असेल म्हणून छेड काढली... पण यात मुलाची काहीच चूक नसते का? तोकड्या कपड्यात घरातल्या पोरीसोरींना पाहिलेलं नसतं का त्याने कधी? त्यांची छेड काढावीशी नाही वाटतं! (याला काही घटना अपवाद आहेत) का? कारण त्या आया बहिणी असतात.
पण बाहेरची मुलगी म्हणेज उपभोगासाठी, मी काहीही केलं तरी फरक पडत नाही, माझं कोणी काही वाकड करू शकत नाही हे विचार त्यांच्या मनावर रुजलेय. तेच पुसायला हवे. बलात्कार पीडित मुलगी उजळ माथ्यानं फिरु शकते का? तिचं कुटुंब समाजात मानानं वावरू शकतं का? नाही. आपण त्यांना बोलून बोलून टोमणे मारून इतकं हैराण करू की कदाचित उद्या ते कुटुंबच आत्महत्या करेल. पण त्याच मुलीवर बलात्कार करणारा उजळ माथ्यानं फिरतो. आपण त्याच्यावर एक बोट उचलत नाही. जणू काही त्यानं काही केलंच नाही. तिच आली त्याच्याजवळ आणि म्हणाली कर रे बाबा बलात्कार... अशी वागणूक समाज म्हणून आपण देतो.
पोटची मुलगी असणारे किती बाप आहेत, जे समोर येणा-या प्रत्येक मुलीचा सन्मान राखत असतील... फारच कमी. नोकरीपेशा महिलांना विचारा आसपास असणारे मुलींचे बापही सहकारी महिलांकडे कसे बघतात. त्यांच्याकडून कशा सुप्त अपेक्षा ठेवतात. हे जर का कळलं ना त्यांच्या मुलींना, तर बाप म्हणणार नाहीत त्या पुन्हा अशा पुरुषांना. आणि हो निर्भया प्रकरणानंतर मेणबत्त्या पेटल्या नव्हत्या का ? थांबले का छेडछाड, बलात्कार प्रकार? काल-परवा बदलापुरात नाही का झाला ४-४ वर्षांच्या मुलींसोबत गैरप्रकार. थांबलेत का तुमच्या मेणबत्त्या नेऊन बलात्कार, छेडछाड? नाही ना? मग का आपण पुन्हा मुर्खासारख्या मेणबत्ता पेटवत बसलोय. अक्कल गहाण ठेवलीय आपण? कुठल्या कायद्याचा धाका या विकृतीला नव्हता आणि पुढेही नसेल, कितीही कडक कायदे असले तरीही हे प्रकार घडणारच...बलात्कार करणाऱ्याला भर चौकात फाशी दिली तरी हे प्रकार थांबणार नाहीत. पण मुलींबाबतीत हे घडू द्यायचे नसेल तर मुली तेवढ्या स्ट्राँग व्हायला हव्या.
समाज इतका समंजस व्हायला हवा की बलात्कार, छेडछाड, विनयभंग झालेली मुलगी उजळ माथ्यानं फिरू शकली पाहिजे समाजात आणि आरोपी त्यानं केलेल्या कृत्याच्या शरमेनं रोज मेला पाहिजे. हा बदल आपण समाज म्हणून घडवू शकतो. या समस्येवर जे औषध आहे ते सोडून भलतेच प्रकार करत बसलोय. एक दिवसात बदल निश्चितच घडणार नाही अनेक वर्ष त्यासाठी जावे लागतील पण आपण सुरुवात करणं गरजेचं आहे तरच बदल दिसेल. मेणबत्या विझवून संस्कारांचा प्रकाश पाडणं गरजेचं आहे. तरच मुली वाचतील आणि मोकळा श्वास घेऊ शकतील. बघा प्रत्येकानं आपापल्या पातळीवर कसं जमतंय आपल्या घरातल्या पुरुषांना हॅन्डल करणं आणि घरातल्या स्त्रिचे इतर स्त्रियांबाबतीतले विचार बदलणं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.