-- योगिता तोडकर (मनोलया कन्स्लटंटस)
E-mail : yogita1883@gmail.com
'सहनशीलता हि आपल्याला मिळालेली सगळ्यात सुंदर भेट आहे, कारण सायकल चालवताना मेंदूला जेवढे कष्ट पडतात तेवढेच मनाला सहनशीलतेसाठी पडतात' असं हेलन केलर म्हणतात.
मंडळी सहनशीलता हि आपल्याला मिळालेली भेट आहे, हे वाचताना यावर प्रत्येकाचे थोडे वेगळेच दृष्टिकोन असणार. हो, ती भेटच आहे. कारण सहनशीलता याकडे जो सकारात्मकपणे पाहू शकतो, त्याला निश्चितच आयुष्यात मनातील शांतता आणि आनंद मिळू शकतो.
तुम्ही म्हणाल, ‘अहो आम्ही वेगळं काय करतोय, मग कधी कामाच्या ठिकाणी बॉस, कधी आयुष्याचा जोडीदार, मुलं - बाळ, आजूबाजूची लोक, यानां किती तरी वेळा आम्ही सहनच करतोय’. एका अर्थी खरं आहे तुमचं... सहनशीलता म्हणजे काय? सोप्या शब्दात बोलायचं झालं, तर आयुष्य सहजपणे जगण्यासाठी ती आपल्याला मिळालेली एक ताकद आहे. गोष्टी जरी आपल्या मनाप्रमाणे घडल्या नाहीत, तरी मनावर त्याचा परिणाम न होऊ देणे.म्हणजेच त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवणं.
मंडळी आपण सगळेच संकटातून, प्रतिकूल परिस्थितीतून जात असतो, याला फार कोणी अपवाद नाहीत.पण याला आपण प्रतिक्रिया देतो कि प्रतिसाद देतो हे महत्वाचं. काही जण एखाद्या परिस्थितीबद्दल कोणाकडे बोलून मन मोकळं करतात, काही जण एखाद्याला टोमणे मारतात, काही दुर्लक्ष करतात, काही हसण्यावारी घेतात. यात तुम्ही कुठे बसता?
तस पाहायला गेलं मंडळी तर आपण सहन करू शकतो असे संस्कार मनावर केले तर ते सहज शक्य आहे आणि त्यामुळे आनंदाबरोबर जगण्याचं स्वातंत्र्यदेखील तुम्हाला मिळू शकत. कारण इथे मनाला होणाऱ्या बहुतांशी यातना नाहीशा होतात आणि मग नाती सहज सोप्पी होतात. साध उदाहरण आपल्या घरातलं लहान मुलं जे काही करत ते आपण किती सहजपणे घेतो, आपण किती सहन करतोय त्या बाळाला हा भाव एकदा तरी निर्माण होतो का? नाही... का बरं? अहो, कारण ते लहान आहे आणि खूप गोष्टी त्याला समजायच्या आहेत, शिकायच्या आहेत हे आपण स्वीकारलेलं असत. म्हणजेच बाळ जस आहे तस त्याचा आपण स्विकार करतो. हेच आपण इतर व्यक्तींबरोबर आणि परिस्थितीबरोबर करूच शकतो.
एखाद माणूस, परिस्थिती अशी - अशी आहे, इथे खरं तर विषय संपतो ना हो….. पण आपला अट्टाहास असतो त्याने अमुक तमुक पद्धतीने वागावं,बोलावं. असं का घडत असेल हो मंडळी... एखादी गोष्ट स्वीकारण्यासाठी मोकळेपणा असावा लागतो. आणि तो असायला हरकतच नाही.. म्हटलंच आहे ना 'व्यक्ती तितक्या प्रकृती'... त्यामुळे व्यक्तिपरत्वे भिन्नता असणारच. आणि हे एकदा लक्षात आलं तर मोकळेपणाने आपण समोरच्याच्या सगळ्या गोष्टींचा स्विकार करू शकतो. म्हणजेच परिस्थितीचा मोकळेपणाने स्विकार करता येऊ शकतो आणि हे जमलं तर मला सहन करावं लागतंय हि भावनाच राहणार नाही.आणि यामुळे कोणत्याही परिस्थितीत मनापासून शांत असणं शक्य होत.
सहनशीलता हे एक कौशल्य आहे. मी किती सहन करतो/ते अस आपण जोपर्यंत म्हणतो, तोपर्यंत व्यक्तीचा अथवा परिस्थितीचा आहे तसा स्विकार आपण मोकळेपणाने करूच शकणार नाही. आणि हो सहन करायचं म्हणजे बोलायचंच नाही, गप्प बसून घुसमटत राहायचं अस मुळीच नाही. तर कठीण परिस्थितीत गोष्टी समजून घेऊन त्याला प्रतिसाद देणं. ज्याचा कोणालाही त्रास होणार नाही. याचाच दुसरा अर्थ माझ्या विचारांवर आणि भावनांवर माझा पूर्णपणे ताबा आहे.आणि त्यामुळे मी स्वतःला कोणताही त्रास करून घेणार नाहीये. आयुष्यात हे जमणं म्हणजे सोन्याहून पिवळी गोष्ट....
हे सगळं कस जमवायचं. त्याच उत्तर आहे संयम आणि कोणतीही गोष्ट सिद्ध करण्याचा अट्टाहास सोडणं. आपल्याकडे म्हणतात ना 'खरं बाहेर येतच' मग ते सिद्ध करायची गरजच काय? सहनशील माणूस काही सिद्ध करायचा प्रयत्न करत नाही.'मला समजून घेतलं पाहिजे' यावरून 'मी नेमकं काय ते समजून घेतलं पाहिजे’ यावर येणं गरजेचं आहे. याने सामावून घेण्याची क्षमता वाढते.
अगदी तुमचा अपमान झाला तरी तुम्ही शांत राहू शकला पाहिजे. त्यात तुम्हाला कोणतही स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. तर स्वतःपुरता स्व - आदर त्यावेळेस बाळगणं महत्वाचे असते. त्यामुळेच तुम्हाला परिस्थितून बाहेर पडणे शक्य होते.
सहनशीलता तुमचं एक सामर्थ्य (strength) बनू शकत. एक आई सामर्थ्यशाली असते. कारण ती घरातल्यांच्या मागण्या, गरजा पूर्ण करत असते. त्यांच्यासाठी झटत असते. का? कारण तिचं घरातल्यांवर खूप प्रेम असत, जाबदारीची भावना असते. आणि तिथेच सहन करायला लागतंय हि भावना संपते हो... आणि परिस्थितीशी जुळवून घ्यायला जमल कि झालं... झाडांचं पण पहा कि प्रत्येक बदलणाऱ्या हंगामात मोकळ्या आकाशाखाली उभी राहतात, तक्रारीचा सूर कुठे असतो त्यात, त्यामुळेच कदाचित त्यांची मूळ घट्ट रोवली जात असतील, ती मूळ छोट्या गोष्टींनी उन्मळून पडत नाहीत... मंडळी प्रेमाची बांधिलकी आणा आणि एका ओतप्रोत ताकदीचा आनंद अनुभवा.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.