बीड : दुष्काळी बीड जिल्ह्यामध्ये यंदा अतिवृष्टीने कहरच केला आहे आणि शेतकऱ्यांच्या पिकांसह जमिनी देखील वाहून गेले आहेत. शेतातील उभी पिकं नेस्तनाबूत झाल्यामुळे शेती उजाड झाली आहे. तर कित्येक नद्यांसह बंधाऱ्यांनी आपला प्रवाह बदलल्याने, शेत जमीनीला नद्याचं स्वरूप आले आहे. यामुळे पुढील अनेक वर्ष शेती पीकाऊ होते की नाही? यावर देखील प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे, असे एक ना अनेक संकट शेतकऱ्यांपुढे उभे असताना, शासनाची शेतकऱ्यांविषयी असलेली उदासीनता आणि सरकारमधील मंत्र्यांकडून दिली जाणारी आश्वासनांची खैरात, यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
याच नैराश्यातून बीड जिल्ह्यात जणूकाही शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्रचं सुरू झालं की काय? असाच प्रश्न जिल्ह्यात होत असणाऱ्या शेतकरी आत्महत्या वरून निर्माण झाला आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीचा कहर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाचं पूजला आहे. यामुळे इथला शेतकरी एका संधीची नेहमी वाट बघत असतो. यंदा तसा योग आला अन पिकांना पूरक असा पाऊस झाला आहे. शेती बहरली सर्व पिके जोमात आली. मात्र, ऐन हातातोंडाशी घास येताच, अस्मानी संकट कोसळले आहे. सर्वत्र अतिवृष्टीचा कहर झाला.
हे देखील पहा-
कधी नव्हे तेवढा पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणं, तलाव, नद्या ओसंडून वाहिल्या, कित्येक तलाव बंधारे फुटले, तर अनेक नद्यांनी पात्र बदलले आहेत. यामुळे हजारो एक्कर शेती उजाड झाली आहे. या अतिवृष्टीत जवळपास 6 लाख 56 हजार 847 शेतकऱ्याचे 8 लाख 98 हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टी बाधित झाल्याची नोंद शासनदरबारी आहे. या अतिवृष्टीबाधित शासनाने मदत देखील घोषित केली आहे. बीड जिल्ह्यासाठी जवळपास 502 कोटींची तरतूद झाली आहे.
मात्र, इथल्या शेतकऱ्यातील नैराश्य अद्यापही शासन अन इथले लोकप्रतिनिधी काढू शकले नाहीत. यामुळे दुष्काळी बीड जिल्ह्यतील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आता मृत्यूला कवटाळत आहे. जिल्ह्यात सप्टेंबर अन ऑक्टोबरच्या पावणेदोन महिन्यात, तब्बल 39 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहेत. तर गेल्या 10 महिन्यात 155 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासन दरबारी आहे. त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांना मदत देत त्यांना आधार द्यावा. अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रुमनं हातात घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांनी दिला आहे.
जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यात कोणत्या महिन्यात किती आत्महत्या शेतकऱ्यांच्या झाल्या आहेत ते पाहुया जानेवारी- 14, फेब्रुवारी- 16, मार्च- 19, एप्रिल- 09, मे- 08, जून- 18, जुलै- 11, ऑगस्ट- 21, सप्टेंबर- 17, ऑक्टोबर - 22, यामध्ये एकूण आतापर्यंत 155 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची नोंद शासन दरबारी करण्यात आली आहे. या 155 पैकी 90 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना, शासनाची मदत मिळाली आहे. तर 16 कुटुंब अपात्र ठरले आहेत, तर उर्वरित प्रतीक्षेत आहेत. दरम्यान कोरोनाच्या संकटात उसनवारी, कर्ज काढून शेतकऱ्यांनी बियाणं आणली, शेती पिकवली.
मात्र, शेतातील पीक हातातोंडाशी येताच, अस्मानी संकट कोसळले. अतिवृष्टीमुळे शेतात होत्याचे नव्हते केलं आणि शेतकरी पुन्हा अस्मानी संकटाच्या खाईत अडकला आहे. यामुळे त्याच्या समोर जगावं कसे? कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा? दसरा गेला. मात्र, दिवाळी कशी करावी? येणाऱ्या रब्बीच्या हंगामात पेरणी कशी करावी? अशा एक ना अनेक प्रश्नाचे काहूर, हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यात घुमत आहे. यामुळे या शेतकऱ्यांना तुटपुंज्या मदतीपेक्षा सरसगट योग्य अशी मदत अन त्यांच्या मालाला योग्य मोबदला मिळणे गरजेचे आहे. तेव्हाचं जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा जगणार आहे. अन्यथा अशाच चिता पेटल्या जाणार आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.