Maharashtra Rain Update : राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. मागील दोन- तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस होत असून यामुळे शेतातील प्रामुख्याने कापूस व मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. काल रात्रीच्या सुमारास नाशिक, जळगाव, बीड, बुलढाणा, वर्धा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. तर अमरावती जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाली. तसेच केज तालुक्यात वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
शेतकऱ्याचा मृत्यू
बीडसह केज तालुक्यातील विविध भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या दरम्यान वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संतराम देवडकर (रा. नाथापूर) असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतात कापूस वेचणीचे काम करण्यासाठी ते गेले असताना हि घटना घडली आहे. तर या पावसामुळे कापसाचे व काढून ठेवलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले असून बीड तालुक्यातील वंजारवाडी परिसरात नदीला पूर आल्याचे पाहायला मिळाले आहे.
अमरावतीत गारपीट
अमरावती : अमरावती जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. गारपीट व अवकाळी पावसामुळे कपाशी, तूर, सोयाबीन, संत्रा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये तिवसा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून कपाशीचे पीक जमीनदोस्त झाले आहे. तर कापणीला आलेले सोयाबीन सुद्धा पावसात भिजले व संत्र्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आमदार यशोमती ठाकूर यांनी आज नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली व तात्काळ पंचनामे करावे व शेतकऱ्यांना मदत द्यावी; अशी मागणी केली. आचारसंहिता लागली असलि तरी प्रशासनाने पंचनामे करावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करत सत्ताधारींवर निशाणा साधला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार
बुलढाणा : बुलढाणासह मोताळा, चिखली मेहेकर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कोसळत आहे. शेतकरी व नागरिकांची दाणादान झाली आहे. काढून ठेवलेली सोयाबीन भिजली आहे. तर उभी असलेली तूर व मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कालपासून जिल्ह्यातील चिखली, मोताळा, बुलढाणा, मेहेकर तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. विजेच्या कडकडाटसह पाऊस कोसळत असल्याने शेतकरी व नागरिक हैराण झाले आहेत. आजही बुलढाणा जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे.
वर्धा जिल्ह्यात गारपीट
वर्धा जिल्ह्यातील काही भागात शनिवारी संध्याकाळी आलेल्या परतीच्या पावसासह गारपिटीने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने देवळी, वर्धा, हिंगणघाट तालुक्यात अधिक नुकसान झाले आहे. देवळी तालुक्याच्या भिडी शिवारामध्ये बोराच्या आकाराची गारपीट झाली. यामुळे कपाशीसह सोयाबीन, पपई, केळी पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पपईची झाडे फळांसह कोलमडून पडले, केळी पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले आहेत. दरम्यान माजी राज्यमंत्री व काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे यांच्याकडून नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.