अकोला: अकोल्यातील (Akola) अकोटमध्ये पांढऱ्या सोन्याला विक्रमी बारा हजार रुपये दर मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या भावात चढउतार पाहायला मिळत होते. अखेर आज कापसाच्या भावाने बारा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यातील कापसाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या अकोट बाजार समितीत कापूस (जाड) हा 12 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली आहे. गत 50 वर्षांच्या इतिहासात यंदा प्रथमच कापसाने 12 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
यावर्षी सुरुवातीपासूनच अकोट येथील बाजार समितीत (Akot Market Committee) कापसाला प्रतिक्विंटल दर दहा हजार रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे वऱ्हाडासह नागपूर जिल्ह्यातील कापूसही अकोटमध्ये विक्रीसाठी येत आहे.
जिल्ह्यात सुरुवातीला अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे कापसाला फटका बसला, त्यानंतर वेचणीला आलेल्या कापसाचे अवकाळीमुळे होत्याचे नव्हते झाले. मात्र, भरवशाचे पीक असलेल्या कापसाला चांगला दर मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन आले आहेत. अकोट बाजार समितीत जिल्ह्यातून कापसाला विक्रमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ओढा अकोटकडे वाढला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बाजार समितीत कापसाची आवक वाढत असल्याचे चित्रही दिसून येत आहे.
फरदळीला भाव मिळेना
यंदा सुरुवातीपासूनच कापसाला भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी दरवाढीची आशा ठेवत साठवणुकीवर भर दिला. तसेच, अनेक शेतकऱ्यांनी दर चांगले असल्याने फरदळीचा कापूसही काढला. दरम्यान, सध्यस्थितीत साठवणुकीच्या कापसाचा चांगला दर मिळत असून, फरदळीच्या कापसाला कमी भाव मिळत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, जिल्ह्यात उलंगवाडी झाल्याने शेतकरीही कापूस विक्री करीत असल्याने अकोट बाजार समितीत आवक वाढली आहे.
दरवाढीचा फायदा कुणाला
गेल्या काही दिवसांपासून कापसाला उच्चांकी दर मिळत आहे. मात्र या दरवाढीचा फायदा कुणाला? कारण यावर्षी अतिवृष्टी आणि अवकाळी मुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. शिवाय उत्पादन खर्चही वाढला. दरम्यान शेतकऱ्यांकडे आर्थिक चणचण असल्याने याचा फायदा स्थानिक व्यापाऱ्यांना झाला. नाईलाजास्तव मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गावातच स्थानीक व्यापाऱ्याकडे कमी भावात कापूस विकला. त्यामुळे वाढत्या भावाचा सर्वाधिक फायदा स्थानीक व्यापाऱ्यांना झाल्याचे चित्र आहे.
कापसाच्या उत्पादनात घट
दरवर्षी बोंड अळी, नैसर्गिक संकट यामुळे कापसाच्या उत्पादनात घट पाहायला मिळत आहे. शिवाय कापसाचा उत्पादन खर्चही परवडत नाही. म्हणून अनेक शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले. मात्र यावर्षी कापूस कमी असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे कधी नव्हे ते क्विंटल मागे बारा हजार रुपये दर मिळलाय. बारा हजार रुपये दर मिळाला असला तरी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मुळे कापूस परवडत नाही. त्यामुळे हेच दर का राहिल्यास कापसाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.