
Trekkers At Harihar Fort: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ महाराष्ट्रातील हरिहर किल्ल्याचा असून, यात हजारो ट्रेकर्स गर्दी करून किल्ला चढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, हा ट्रेक भारतामधील सर्वात धोकादायक ट्रेक्सपैकी एक मानला जातो. अशात इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रेकर्सची गर्दी पाहून अनेकांनी सुरक्षेच्या बाबतीत चिंता व्यक्त केली आहे. यामुळे ट्रेकिंग दरम्यान होणारे अपघात, आपत्कालीन उपाययोजना आणि शासनाच्या नियमांविषयी पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
हरिहर किल्ल्यावरच्या एका व्हायरल व्हिडिओत दिसते की, ट्रेकर्सचा लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काही तरुण-तरुणी ट्रेल्सवर चालत आहेत तर काहीजण दगडांवर चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पायऱ्या अत्यंत अरुंद असून एका वेळी एकच व्यक्ती त्यावरून जाऊ शकते, त्यामुळे गर्दीमुळे प्रचंड अडथळा निर्माण झालेला आहे. पावसाळ्यामुळे दगड ओले आणि निसरडे झालेले असतात, त्यामुळे घसरण्याचा धोका दुपटीने वाढतो. याशिवाय किल्ल्यावरील काही भागांत कोपऱ्यांना रेलिंग्स किंवा सुरक्षा जाळी नाही, यामुळे तोल जाण्याचा आणि अपघात होण्याचा मोठा धोका असतो.
हरिहर किल्ला नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरजवळ वसलेला असून तो साधारण ३,६७६ फूट उंच आहे. किल्ल्याचा ट्रेक म्हणजे ट्रेकर्ससाठी एक रोमांचकारी अनुभव असतो. ८० डिग्री उभ्या कोनात कापलेले दगडी पायऱ्यांचे जिने हा या किल्ल्याचा मुख्य आकर्षणबिंदू आहे. हे जिने पाहिल्यावर कोणाच्याही अंगावर शहारे येतात. या किल्ल्यावर चढताना चुकून पाय घसरला, तर थेट खोल दरीत पडण्याचा धोका असतो. त्यामुळे हा ट्रेक "हाय रिस्क, हाय थ्रिल" मानला जातो.
एकीकडे ट्रेकिंगचा उत्साह वाढतो आहे, पण दुसरीकडे सुरक्षेच्या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित होतात. अशा धोकादायक ट्रेकिंग स्पॉट्सवर नियंत्रण नसेल, तर अपघातांची शक्यता प्रचंड वाढते. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओही याचेच उदाहरण आहे. गर्दीत काहीजण पुढे निघण्याचा अट्टाहास करतात, त्यामुळे मागच्यांचे तोल जाऊ शकतो. आणीबाणीच्या वेळी रेस्क्यू टीमला पोहोचायला अडचण येऊ शकते. यामुळे अपघात टाळण्यासाठी नियोजन, मार्गदर्शन आणि सुरक्षाविषयक खबरदारी आवश्यक आहे.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.