सध्या राज्यासह संपूर्ण देशभरात नवरात्रीचा उत्साह आहे. यानिमित्ताने ठिकठिकाणी दांडिया तसेच गरबा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अशातच दांडिया आणि गरब्याच्या कार्यक्रमात हृदयविकाराचा झटका येऊन अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असाच काहीसा प्रकार पुणे शहरातही घडला आहे. गरबा डान्स करत असताना एका सुप्रसिद्ध गरबा डान्सरचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे.
अशोक माळी, असं मृत्युमुखी पडलेल्या गबरा डान्सरचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक माळी हे मूळ धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून ते सध्या चाकण परिसरात वास्तव्यास होते. नवरात्रीनिमित्त पुण्यातील राजगुरुनगरमध्ये गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गरबा कसा खेळला जावा यासाठी अशोक हे चिमुकल्या मुलांना प्रशिक्षण देत होते.
गरबा खेळत असताना अशोक माळी यांना अचानक हृदय विकाराचा तीव्र झटका आला. छातीत वेदना झाल्याने ते गरबा खेळता-खेळता अचानक जमिनीवर कोसळले. यावेळी स्थानिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अशोक माळी यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालय दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
दरम्यान, अशोक माळी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अशोक माळी खूप आनंदाने एका चिमुकल्यासोबत गरबा खेळताना दिसत आहेत. गरब्याच्या कार्यक्रमात अनेक नागरिकांची उपस्थिती दिसून येत आहे. त्यावेळी गरबा खेळता-खेळता अशोक यांच्या अचानक छातीत दुखू लागते.
त्यामुळे छातीला हात लावून खाली बसण्याचा प्रयत्न करतात. हा संपूर्ण प्रकार उपस्थितांच्या लक्षात येतो. मंडळाच्या कार्यकर्ते तातडीने उपचारासाठी अशोक माळी यांना रुग्णालयात घेऊन जातात. मात्र, रुग्णालयात जाण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार एका मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नेटकरी दु:ख व्यक्त करीत आहेत.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.