VIDEO : 'फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही', मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
मला दोनवेळा कोविड झाला तरी मी वाचलो. कारण मला तुमची सेवा करायची होती, महाराष्ट्राचा विकास करायचा होता. आम्ही घाबरून घरात बसलो नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाटण मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच आधीचं महाविकास आघाडीचं सरकार हे बहिरं होतं, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
आधीचं सरकार काहीही ऐकत नव्हतं. फक्त मेरी आवाज सुनो एवढंच त्यांना माहिती होतं. घरात बसून फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही. त्यासाठी लोकांच्या बांधावर जावं लागतं. शेतकऱ्यांची अडचण ऐकावी लागते. फक्त कोमट पाणी प्या असं म्हणून चालत नाही. लोकांच्या पोटाला काय पाहिजे? हे देखील विचारावं लागतं. कोवीडच्या काळात मी पीपीई किट घालून लोकांमध्ये गेलो. शंभूराज देसाई हे सुद्धा गेले. मला माहिती आहे की, जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा शंभूराज देसाई पुढे असतात. त्यामुळे येथील जनतेने त्यांना तीन वेळा निवडून दिलं. या ठिकाणी मला कोणीतरी सांगितलं की, तिरंगी लढत आहे, मला तर या ठिकाणी एकतर्फी लढत दिसतेय. या ठिकाणी कोणीही आलं तरी त्याचा निभाव लागणार नाही'', असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Edited By Rakhi Rajput
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.