Maharashtra Politics: तुझी फाईल काढली म्हणून तू भाजपकडे पळालास – खोतकरांचा गोरंट्यालांवर घणाघात |VIDEO

Arjun Khotkar vs Kailas Gorantyal: शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपमध्ये फाईलपासून वाचण्यासाठी पळाल्याचा आरोप करत खोतकरांनी गोरंट्यालला गद्दार ठरवलं आणि भविष्यात भाजप त्याला बाहेरचा रस्ता दाखवेल, असंही भाकीत केलं.

जालना: शिवसेना (शिंदे गट) आमदार अर्जुन खोतकर यांनी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावर सडकून टीका केली आहे. मला याचं काहीच नवल वाटत नाही. आधीपासूनच याचे भाजपमधील काही नेत्यांशी अनैतिक संबंध होते. आतापर्यंत लपूनछपून संबंध होते, आता उघडपणे घरोबा केला असा टोला खोतकरांनी लगावला.

मी पहिली निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढवली आणि आठवी निवडणूकही शिवसेनेतूनच लढवतोय. माझी निष्ठा पक्षाशी आहे. गोरंट्याल यांनी मला गद्दार संबोधलं, पण खऱ्या अर्थानं गद्दार कोण आहे हे आता जनतेने ठरवावं. त्यांनीच पक्ष सोडला आणि भाजपमध्ये गेले, त्यामुळे त्यांच्या डोक्यावर कायम गद्दारीचा शिक्का राहणार आहे, असं खोतकर म्हणाले.

गोरंट्याल यांनी खोतकर व त्यांच्या कुटुंबीयांवर केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना खोतकर म्हणाले, जर तुझ्याकडे फाईल असेल तर ती काढ. माझ्याकडेही तुझी फाईल आहे. तीच काढली म्हणून तू भाजपमध्ये पळालास. तिथे आसरा घेतलास.

आज भाजपला गोरंट्यालच्या भ्रष्टाचाराची माहिती नाही. पण जेव्हा ती माहिती त्यांच्याकडे जाईल, तेव्हा भाजप त्याला तात्काळ बाहेरचा रस्ता दाखवेल, असा इशाराही खोतकरांनी दिला. गोरंट्याल यांनी कुटुंबावर केलेल्या आरोपावर खोतकर म्हणाले, मी कधीही माझ्या आई किंवा पत्नीच्या बाबतीत राजकारणात बोललो नाही. आम्ही केवळ नगराध्यक्षा म्हणून त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले.

त्याने माझ्या आईवर टीका केली. मग त्याच्या आईबाबतची माहिती माझ्याकडे आहे. त्याचा सख्खा भाऊ काय बोलतो याची क्लिप माझ्याकडे आहे. ती जर मी सार्वजनिक केली, तर याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा थेट इशारा खोतकरांनी दिला. गोरंट्याल यांनी भाजपचा महापौर होईल असा दावा केला होता. त्यावर खोतकर म्हणाले, हा पहिल्यांदा तिथे कार्यकर्ता झाला, आणि लगेच दावा करू लागला. निर्णय नेते घेतात, कार्यकर्ते नाही. माझी कुणी कोंडी करत नाहीये. उलट मी भाजपचे आभार मानतो की त्यांनी त्याला पक्षात घेतलं. आता तेच त्याला थप्पड लावतील, असा उपरोधिक टोलाही खोतकरांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com