

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराट कोहलीने सलग दुसरे शतक झळकावले. रांची येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यातील शतकानंतर किंग कोहलीने रायपूर एकदिवसीय सामन्यातही शतक झळकावलंय. एकदिवसीय मालिकेच्या दुसऱ्या समान्यात कोहलीने शांत आणि संयमी खेळी खेळत दुसरं शतक ठोकलं. यासह कोहलीने एकाच स्थानावर सर्वाधिक एकदिवसीय शतके करण्याचा सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रमही मोडलाय. दरम्यान कोहलीनं सलग दुसरं शतक केल्यानंतर गौतम गंभीरच्या रिअॅक्शनचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात चांगली झाली. पण पाचव्याच षटकात रोहितनं आपली विकेट गमावली. पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या रोहितला या दुसऱ्या सामन्यात मोठी खेळी खेळता आली नाही. तो अवघ्या १४ धावांवर बाद झाला. त्यानंतर टीम इंडियाला १० व्या षटकात दुसरा धक्का बसला. यशस्वी जयस्वाल २२ धावांवर बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या कोहलीने षटकार मारून आपले खाते उघडले.
दोन विकेट गमावल्यानंतर विराट आणि ऋतुराज गायकवाडने डाव सावरला. दोघांनी शतकं ठोकली. दरम्यान कोहलीने ४७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तर ३४ व्या षटकात ऋतुराजने फक्त ७७ चेंडूत आपले शतक पूर्ण केलंय. हे त्याच्या एकदिवसीय क्रिकेटच्या करिअरमधील पहिलं शतक आहे. तो १०५ धावांवर असताना ऋतुराज गायकवाडची विकेट पडली.
कोहली आणि ऋतुराज यांनी १९५ धावांची भागीदारी केली. कोहलीने ३८ व्या षटकात ९० चेंडूत शतक पूर्ण केलं. कोहलीचे हे सलग दुसरे शतक होते. तर हे त्याच्या एकदिवसीय क्रिकेटच्या करिअरमधील ५३ वे शतक होते. दरम्यान विराट कोहली १०२ धावांवर झेलबाद झाला. त्याने ९३ चेंडूत १०२ धावा केल्या, या सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. दरम्यान कोहलीनं दुसरं शतक पूर्ण केल्यानंतर त्याने आपल्या अनोख्या अंदाजानं सेलिब्रेशन केलं.
गळ्यात लॉकेटमधून घातलेली अंगठीचं चुंबन घेतलं. त्यानंतर वरती पाहत देवाचे आभार मानले. त्याचदरम्यान प्रशिक्षक गौतम गंभीरची रिअॅक्शन व्हायरल होऊ लागली. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वाद आहे. त्यांच्यातील वादाच्या शीत युद्धाच्या बातम्या अनेकवेळा प्रसारित झाल्या आहेत. त्यामुळे विराटनं झळकावलेलं सलग दुसरं शतक पाहून गौतम गंभीरची रिअॅक्शन काय असेल? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. विराट कोहलीने शतक केल्यानंतर गौतम गंभीर आपल्या सीटवरून उभे राहत टाळ्या वाजवल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.