आयपीएल २०२४ स्पर्धेत आतापर्यंत ३१ सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान अनेक मोठ मोठे रेकॉर्ड बनवले गेले आहेत. अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख असलेल्या सुनील नरेनने राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात आपल्या कारकिर्दीतील पहिलं वहिलं शतक झळकावलं. या शतकी खेळीसह त्याच्या नावे अनेक मोठ मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ५६ चेंडूंचा सामना केला आणि १०९ धावा केल्या. या खेळीसह त्याने एक स्पेशल रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. जो आजवर केवळ रोहित शर्मा आणि शेन वॉटसनलाच करता आला होता. तो आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात हॅट्ट्रिक घेणारा आणि शतक पूर्ण करणारा तिसराच खेळाडू ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटी फलंदाजी करण्यासाठी येणारा सुनील नरेन आयपीएल स्पर्धेत डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर येतोय. त्याने ४९ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. तसेच २०१३ मध्ये त्याने पंजाबविरुद्ध खेळताना हॅट्ट्रिक घेतली होती. त्याने डेव्हिड हसी, गुरकिरत सिंग आणि अजहर महमूदला सलग ३ चेंडूंवर बाद करत माघारी धाडलं. त्याच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत १६८ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १ अर्धशतक आणि १ शतक झळकावलं आहे. त्याच्या नावे १३२२ धावा करण्याची नोंद आहे.
सुनील नरेनने फलंदाजी करताना धावांचा पाऊस पाडला आहे. यासह गोलंदाजीतही त्याची जादू पाहायला मिळाली आहे. त्याने १६८ सामन्यांमध्ये १६८ गडी बाद केले आहेत. दरम्यान या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने २२३ धावांची खेळी केली. यादरम्यान सुनील नरेनने सर्वाधिक १०९ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाकडून जोस बटलरने १०५ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.