
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने रविवारी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात महत्वपूर्ण खेळी खेळली. तिने विशाखापट्टनम येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे वर्ल्डकप २०२५ च्या सामन्यात दमदार फलंदाजी करत अनेक विक्रम मोडले. स्टार सलामीवीरने ६६ बॉल्समध्ये ८० धावा केल्या. यामध्ये ९ चौकार आणि ३ षटकारांचा सामवेश होता. तिचे १४ वे शतक जरी हुकले असेल तरीही मानधनाने अनेक विक्रम मोडत इतिहास रचला आहे. मानधना ही वनडे महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावा करणारी भारतीय खेळाडू ठरली आहे. तिने भारताच दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीचाही विक्रम मोडला आहे.
वर्ल्डकपमध्ये मानधनाने मोडला कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड
भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावा करणारी पहिली खेळाडू ठरली आहे. तिने फक्त ११२ डावांमध्ये हा पराक्रम केला. वनडे क्रिकेटमध्ये हा विक्रम आधी विराट कोहलीच्या नावावर होता. विराट कोहलीने ११४ डावांमध्ये ५००० धावा पूर्ण केल्या होत्या. २९ वर्षाची मानधना ही महिला वनडे क्रिकेटमध्ये ५००० किंवा त्याहून अधिक धावा करणारी दुसरी भारतीय आणि एकूण पाचवी खेळाडू बनली आहे.
मानधनाने वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलरला मागे टाकले, टेलरने १२९ डावांमध्ये ५००० धावा पूर्ण केल्या होत्या. तर न्यूजीलंडच्या सूजी बेट्सने ६,१८२ बॉल्समध्ये ५००० धावा केल्या होत्या. स्मृती मानधना आता वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५,००० एकदिसीय धावा पूर्ण करणारी जगातील तिसरी खेळाडू ठरली आहे. पाकिस्तानचा बाबर आझमने ९७ डावांमध्ये तर दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमलाने १०१ डावांमध्ये ५००० धावा केल्या आहेत. तसेच मानधनाने सर्वात कमी वयात जलद ५००० धावा करण्याचा इतिहास रचला आहे.
एका कॅलेंडर ईयरमध्ये १००० धावांचा विक्रम
स्मृती मानधनाने केवळ सर्वाधिक ५००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम नाही केला तर तिने एका कॅलेंडर ईयरमध्ये वनडे क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण करत बेलिंडा क्लार्कचा विक्रम देखील मोडला आहे. कॅलेंडर ईयरमध्ये १००० धावा करणारी ती जगातील पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे. ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कने १९९७ च्या कॅलेंडर ईयरमध्ये ९७० धावा करण्याचा विक्रम केला होता. मानधनाने या वर्षी ४ वनडे शतकं ठोकली आहेत. तसेच २०२५ मध्ये वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत अव्व्ल स्थानी आहे.