
भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. आठवडाभराच्या कालावधीतच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. इंग्लंड दौऱ्याआधीच या दोघांनी घेतलेल्या निवृत्तीमुळं क्रिकेट विश्वात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रोहित शर्माच्या रिटायरमेंटवरून आता रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहितबद्दल बोलताना शास्त्रींनी प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा यानं ७ मे रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. रोहित शर्मा यानं अखेरचा कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळला होता. त्याच्या नेतृत्वाखाली संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर मालिकेच्या अखेरच्या सामन्यात रोहित शर्मा खेळला नव्हता. सीडनीमध्ये खेळल्या गेलेल्या अखेरच्या कसोटीत रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्येही नव्हता. रोहितनं स्वतः या निर्णयावर प्रतिक्रिया दिली होती. त्या सामन्यात न खेळण्याचा निर्णय त्याने स्वतःहून घेतला होता.
सीडनी कसोटीत न खेळण्याच्या रोहितच्या निर्णयावर आता माजी प्रशिक्षक आणि प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. रवी शास्त्री यांनी आयसीसीच्या रिव्ह्यू शोमध्ये याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये माझं रोहित शर्मासोबत बोलणं झालं होतं. सीडनी टेस्टमध्ये न खेळण्याच्या निर्णयावर चर्चा झाली होती. त्यावेळी मी जर कोच असतो तर असं झालं नसतं, असं मी रोहितला म्हणालो होतो. तू सीडनी कसोटीत खेळला असता. कारण ती मालिका निर्णायक स्थितीत होती, असं शास्त्री यांनी सांगितलं.
रवी शास्त्रींनी रोहित शर्माच्या रिटायरमेंटवर नाराजी व्यक्त करतानाच, प्रशिक्षक गौतम गंभीरच्या रणनीतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मी लगेच हार मानणारा नाही. मालिका २-१ अशी असताना टीममधून बाहेर जाण्यासारखी परिस्थिती नव्हती. तो असा सामना होता की त्यात ३० - ४० धावाही खूप होतात, असं शास्त्री म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.