पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय हॉकी संघाला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यासह टीम इंडियाचे ४४ वर्षांनंतर अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्नही भंगले. रोमहर्षक उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीने भारताचा ३-२ असा पराभव केला आणि यासह अंतिम फेरीत धडक मारली. त्याचबरोबर टीम इंडियाला पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. असे असतानाही भारतीय संघाला पॅरिसमधून पदक जिंकून परतण्याची संधी आहे. टीम इंडिया आता कांस्यपदकासाठी सामना करेल. भारताचा पुढील सामना ८ ऑगस्टला स्पेनशी होणार आहे. तर सुवर्णपदकासाठी जर्मनीची स्पर्धा नेदरलँडशी होणार आहे.
हॉकी सेमीफायनल सामन्याचा पहिला क्वार्टर संपेपर्यत भारतीय संघाने आघाडी घेतली होती. दुसऱ्या क्वार्टरमध्ये जर्मनीनेही १ गोल करत सामन्यात रोमांच आणला. त्यानंतर भारत खेळात पूर्णपणे वापसी करू शकला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये जर्मनीच्या संघाने २-१ ,अशी आघाडी घेतली होती. तिसऱ्या क्वार्टरपर्यंत जर्मनीच्या संघाने भारताला गोल करण्याची संधी दिलीच नाही. उपांत्य फेरीचा सामना असतानाही भारतीय संघाचा मारा हा पुरेसा प्रभावी ठरला नाही.
त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नरमध्ये गोल करत भारतीय हॉकी संघाने मोठ्या मेहनतीने दुसरा गोल करत सामना बरोबरीत आणला. सुखजीतने टीम इंडियासाठी दुसरा गोल केला. मात्र विजयी होण्यासाठी तिसरा गोल करण्यात भारतीय संघ अपयशी ठरला. भारतीय संघाने मागील सामन्यात धमाकेदार खेळ करत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली होती. भारताने ऑस्ट्रेलिया आणि ग्रेट ब्रिटनविरुद्ध सलग दोन मोठे आणि अटीतटीचे सामने जिंकले होते.
त्यामुळे संघाचे मनोबल उंचावले होते. टीम इंडियाने मैदानावर या उत्साही खेळांना घेऊन चमकदार सुरुवात केली आणि तिसऱ्या मिनिटालाच पेनल्टी कॉर्नर जिंकला. पण यामध्ये एकही गोल होऊ शकला नाही. त्यानंतर सातव्या-आठव्या मिनिटाला भारताला सलग ३ पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि तिसऱ्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीतने ड्रॅग फ्लिक करत गोल केला. त्यानंतर दुसरा गोल करण्याचा टीम इंडियाने खूप प्रयत्न केले पण जर्मनीने सर्व प्रयत्न रोखले.
टीम इंडियाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये दडपण आणण्यास सुरुवात केली. त्याचा फायदा झालाही ३८ व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या पेनल्टी कॉर्नरवर सुखजित सिंगने डिफ्लेक्शनसह गोल केला आणि स्कोअर २-२ असा बरोबरीत आणला. या क्वार्टरमध्ये नंतर कोणाचाच गोल झाला नाही. त्यानंतर शेवटच्या क्वार्टरवर सर्वांच्या नजरा होत्या. यावेळी जर्मनीने आक्रमण वाढवले होते. त्यामुळे त्यांना अनेक पेनल्टी कॉर्नरही मिळाले पण गोलरक्षक पीआर श्रीजेशसह संपूर्ण बचाव फळीने त्यांचा गोल करण्याचा प्रयत्न हाणून पाडला.
मात्र सामन्याच्या अखेरच्या ६ मिनिटे अगोदर जर्मनीने डाव्या बाजूने उत्कृष्ट चाल करत तिसरा गोल केला. त्यानंतर जर्मनीने ३-२ अशी आघाडी घेतली. त्यानंतर भारतीय संघाने उरलेल्या मिनिटांत खूप प्रयत्न केले, पण टीम इंडिया गोल करण्यात अपयशी ठरली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.