
मुंबई क्रिकेट असोसिएशनने शनिवारी वानखेडे स्टेडियमवर ‘एमसीए शरद पवार क्रिकेट म्युझियम’चं भव्य उद्घाटन केलं. तब्बल 8 हजार चौरस फूट जागेत उभारलेलं हे जागतिक दर्जाचे संग्रहालय मुंबईच्या क्रिकेट परंपरेला आणि जागतिक क्रिकेटमधील तिच्या योगदानाला दिलेली मोठी दाद मानली जातंय. या कार्यक्रमाला मान्यवर, क्रिकेट दिग्गज, प्रशासक आणि मुंबई क्रिकेटशी जोडलेले अनेक जण उपस्थित होते.
22 सप्टेंबर 2025 पासून हे संग्रहालय सर्वसामान्यांसाठी खुलं होणार असून प्रवेशासाठी ऑनलाईन बुकिंग अनिवार्य असणार आहे. या म्युझियमचे तिकिट दर आणि वेळापत्रकाची माहिती लवकरच जाहीर होणार आहे.
संग्रहालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर शरद पवार आणि सुनील गावस्कर यांचे पुतळे उभारले गेले आहेत. हे पुतळे मुंबई क्रिकेटचा आत्मा आणि अनेक पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या दिग्गजांना सलाम करतात.
आत प्रवेश केल्यावर प्रेक्षकांना क्रिकेटशी संबंधित मौल्यवान वस्तू, इंटरअॅक्टिव्ह गॅलऱ्या आणि आधुनिक डिजिटल अनुभव यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. या ठिकाणी मुंबईच्या क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंना, महिलांच्या क्रिकेटला, भारताच्या वर्ल्ड कप विजयांना, प्रशासकांच्या योगदानाला आणि एमसीएच्या क्लब सदस्यांना स्वतंत्र विभागात स्थान देण्यात आलं आहे. इतिहासातील दुर्मिळ वस्तूंपासून ते अत्याधुनिक ऑडिओ-व्हिज्युअल अनुभवापर्यंत सर्वकाही याठिकाणी पाहायला मिळणार आहे.
या संग्रहालयात मुंबईतील दिग्गज खेळाडूंनी दिलेली दुर्मिळ आणि ऐतिहासिक स्मृतिचिन्हं ठेवण्यात आली आहेत. या वस्तू मुंबईच्या क्रिकेटचा सुवर्ण वारसा सांगतात आणि जागतिक क्रिकेटमधील तिच्या प्रभावाची जाणीव करून देतात.
एनसीपी अध्यक्ष शरद पवार म्हणाले “माझ्या नावाने हे संग्रहालय उभारण्यात आलं याचा मला अभिमान आहे. मुंबईच्या मैदानांपासून जागतिक स्तरापर्यंतचा क्रिकेट प्रवास हा मेहनत, जिद्द आणि उत्कटतेचा आहे. या संग्रहालयात त्या प्रवासाची परंपरा आणि अनेक अदृश्य हिरोंचं योगदान जपलं गेलं आहे. मला आशा आहे की हे पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देईल.”
“मी नेहमीच क्रिकेट इतिहासाचा विद्यार्थी राहिलो. आमच्या काळी व्हिडिओ नव्हते, फक्त पुस्तके आणि मासिकांमधून शिकावं लागायचं. त्यामुळे हे संग्रहालय पाहून मला मनापासून आनंद झाला. युवा खेळाडूंना इथून मोठी प्रेरणा मिळेल. डिजिटल स्वरूपामुळे जुन्या काळातील क्रिकेटची झलक आजच्या पिढीला दाखवता येणार आहे. हे एक मोठं काम एमसीएने केलं आहे, असं माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी म्हटलंय.
एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितलं की, “शरद पवार साहेब आणि सुनील गावस्कर सर यांचे पुतळे वानखेडेवर उभारले जाणं म्हणजे आमच्यासाठी मोठा अभिमान आहे. पवार साहेबांनी प्रशासनात दिग्गज नेतृत्व करून एमसीए, बीसीसीआय आणि आयसीसीला उंचीवर नेले, तर गावस्कर सरांनी त्यांच्या खेळीने भारतीय क्रिकेटचा काळच बदलून टाकला. दोघेही युवकांसाठी सदैव प्रेरणास्थान राहतील.”
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आशिष शेलार म्हणले, “लॉर्ड्सच्या म्युझियमप्रमाणे वानखेडेलाही नवी ओळख मिळाली आहे. क्रिकेटचा इतिहास इतक्या सुंदर पद्धतीने जतन केल्याबद्दल एमसीएचे मनापासून अभिनंदन. जागतिक पातळीवर हे संग्रहालय मुंबईचा सन्मान वाढवणार आहे.”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.