इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याची शानदार फलंदाजी पाहता, तो लवकरच सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डच्या जवळ पोहोचणार अशी चिन्ह दिसून येत आहे. श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने बॅक टू बॅक शतक झळकावलं आहे.
या शतकी खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ७ वे स्थान गाठले आहे. दरम्यान अव्वल स्थानी असलेल्या सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्यासाठी अवघ्या ३५४४ धावांची गरज आहे. त्याची फलंदाजी पाहता,जर तो पुढील ३-४ वर्ष अशीच फलंदाजी करत राहिला, तर तो सहज सचिनला मागे सोडून पुढे जाऊ शकतो.
जो रुटला सचिन तेंडुलकरचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे. दरम्यान त्याला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. 'तुझं लक्ष सचिनचा रेकॉर्ड मोडण्यावर आहे का?' असा प्रश्न विचारला असता जो रुट म्हणाला की,'मला फक्त खेळायचं आहे. संघासाठी योगदान द्यावं,हाच माझा प्रयत्न आहे. जितक्या जास्त धावा करता येतील,तितक्या अधिक धावा करायच्या आहेत मला. मी कुठपर्यंत पोहचू शकतो, मला हेच पाहायचंय.'
तसेच तो पुढे म्हणाला की,' याहून सुंदर अनुभव दुसरा काहीच असू शकत नाही. मला म्हणायचंय की, हे खरंच आश्चर्यचकीत करणारं आहे. जेव्हा तुम्हाला माहित आहे की, तुम्ही शतक झळकावलं आहे आणि तुम्ही म्हणता की, यात काही मोठं नाही. तर तुम्ही खोटं बोलताय. मात्र कसोटी सामना जिंकण्यासारखी दुसरी कुठलीच फिलींग असू शकत नाही. माझ्यासाठी संघाच्या विजयात योगदान देणंच महत्वाचं आहे.'
श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जो रुटची बॅट चांगलीच तळपली. लॉर्ड्सच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात रुटने पहिल्या डावात १४३ धावांची खेळी केली. तर या सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने १०३ धावांची खेळी केली आहे. यासह लॉर्ड्सच्या मैदानावर खेळताना दोन्ही डावांमध्ये शतक झळकावणारा तो चौथाच फलंदाज ठरला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.