भारतीय संघासाठी २०२३ हे वर्ष एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. २०२३ मध्ये भारतीय संघाला एकदा नव्हे तर दोनदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याची संधी मिळाली होती. वर्ल्डकप २०२३ आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. (Team India Schedule)
दरम्यान हा पराभव विसरुन भारतीय संघ नवीन वर्षात नवीन सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.भारतीय संघाची नवीन वर्षाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याने होणार आहे. हा सामना ३ ते ७ जानेवारीदरम्यान केपटाऊनच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान जाणून घ्या भारतीय संघाचं आगामी वर्षातील वेळापत्रक.
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना झाल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतणार आहे. दरम्यान मायदेशात आल्यानंतर भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे.
इंग्लंडचा संघ जानेवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. क्रिकेट चाहत्यांना टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेपूर्वी ५ कसोटी सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना २५ जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. तर मालिकेतील शेवटचा कसोटी सामना ७ मार्च रोजी खेळला जाणार आहे.
आगामी वर्षात भारतीय संघासमोर असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे टी-२० वर्ल्डकप स्पर्धा जिंकणं. टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचे आयोजन वेस्टइंडिज आणि अमेरिकेत केले जाणार आहे. भारतीय संघाने २००७ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना टी-२० वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर भारतीय टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. (Latest sports updates)
टी-२० वर्ल्डकप झाल्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे.
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावरुन परतल्यानंतर बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघासमोरील सर्वात मोठं आव्हान म्हणजे न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका. न्यूझीलंडचा संघ भारतीय संघाला कडवी झुंज देताना दिसून येऊ शकतो. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे .
भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. गेल्या २ मालिकांमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन पराभूत केलं आहे. २०१८-१९ मध्ये झालेल्या मालिकेत भारतीय संघाने २-१ ने बाजी मारली होती. तर २०२०-२१ मध्ये झालेल्या मालिकेत भारतीय संघाने २-१ ने मालिका खिशात घातली होती. यावेळी भारतीय संघाकडे विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.