मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेत कोण बाजी मारणार, याचा फैसला रविवारी होणार आहे. सुरुवातीच्या दोन लढती दक्षिण आफ्रिकेनं जिंकल्यानंतर, पुढील दोन सामने टीम इंडियाने सहज जिंकले आहेत. त्यामुळे ही मालिका सध्या २-२ अशी बरोबरीत आहे.
या टी-२० मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना रविवारी होणार आहे. यंग टीम इंडिया हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. सुरुवातीच्या दोन सामन्यांमधील कामगिरीतील उणिवा दूर करून चांगली कामगिरी करून टीम इंडियाचे शिलेदार मालिकाविजय मिळवतील अशी क्रिकेट रसिकांना अपेक्षा आहे. (India Vs South Africa 5th T 20 Match preview Highlights)
टीम इंडियाने (Team India) आठ दिवसांमध्ये चार सामने खेळले आहेत. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रवीड यांनी अद्याप संघात कोणतेही मोठे बदल केले नाहीत. सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतरही भारताने जबरदस्त वापसी करून तिसरा सामना ४८ धावांनी आणि चौथा सामना ८२ धावांनी जिंकला. भारतीय संघ अद्याप दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात कधीच टी-२० मालिका जिंकलेला नाही.
दिनेश कार्तिकने मागील लढतीत धडाकेबाज फलंदाजी करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. तर हर्षल पटेल आणि आवेश खान यांनी अपेक्षेनुसार चांगली कामगिरी केली. युजवेंद्र चहल आयपीएलमधील आपल्या होम ग्राउंडवर निर्णायक सामन्यात चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे. एम. चिन्नास्वामी मैदानावर जेव्हा दोन्ही संघ उतरतील, त्यावेळी आधीच्या दोन सामन्यांत पराभूत झालेली टीम इंडिया विजयाचा प्रबळ दावेदार असेल, यात शंकाच नाही.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा हा दुखापतीतून बरा झाला नाही तर, संघाचा त्याची कमतरता नक्कीच जाणवेल. मागील दोन लढतींमध्ये त्याची फलंदाजी अपेक्षित अशी झालेली नाही. दुसरीकडे भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व दाखवलं आहे आणि अखेरच्या सामन्यातही खोचक मारा करून दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना जेरीस आणतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या मालिकेत टीम इंडियानं सर्वोत्तम कामगिरी केली नसली तरी, दोन सामन्यांत वापसी करून पंतच्या नेतृत्वाखालील संघ अभिनंदनास पात्र ठरला आहे. युवा नेतृत्व रिषभ पंतनं नेतृत्व गुण सिद्ध केलं आहे. पण फलंदाजीत तो विशेष असं काही करू शकला नाही. जर भारतानं ही मालिका जिंकली, तर तो हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांच्यासोबत शर्यतीत असेल यात शंका नाही. कारण २०२३ वर्ल्डकपनंतर भारतीय संघात पुन्हा मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टीम इंडियातील टॉप ३ मध्ये बदल करण्याचा विचार सध्या द्रविड करत असतील, अशी चर्चा सुरू आहे. ऋतुराज गायकवाड हा चांगल्या फॉर्मसाठी धडपडत आहे. त्याच्या कामगिरीत सातत्य दिसून येत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचा सामना अनुभवी गोलंदाजांशी होणार आहे. दुसरीकडे, इशान किशनकडे भात्यातील सर्वोत्तम फटके नाहीत. त्याचे फलंदाजीचे तंत्र मर्यादित असल्याचे दिसते. या मालिकेत त्याने चांगल्या धावा केल्या असल्या तरी, ऑस्ट्रेलियातील मैदानांवर वेगवान मारा आणि उसळी घेणारा चेंडू यामुळे तो अडचणीत येऊ शकतो.
श्रेयस अय्यरलाही संपूर्ण मालिकेत खेळण्याची संधी मिळाली आहे. पण तो साजेशी खेळी करू शकलेला नाही. त्याला संधीचं सोनं करता आलेले नाही. भारतीय संघ आता आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामने खेळणार आहे. त्यावेळी सूर्यकुमार यादवला संधी मिळेल.
Edited By - Nandkumar Joshi
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.