IND vs SA 1st T20 : तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाचा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील हा सलग तिसरा विजय आहे. याआधी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील सलग दोन सामने जिंकले होते. (IND vs SA 1st T20 Live Updates)
रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयासह एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. एकाच कॅलेंडर वर्षात सलग 16 विजय मिळवणारा तो टीम इंडियाचा पहिला कर्णधार ठरला. रोहितच्या आधी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने एका कॅलेंडर वर्षात 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले होते. धोनीने 2016 मध्ये हा पराक्रम केला होता.
तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड स्टेडियमवर गुरूवारी भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघादरम्यान पहिला टी20 सामना खेळवण्यात आला. टीम इंडियाने या सामन्यांत दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट राखून सहज विजय मिळवला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टीम इंडियापुढे विजयासाठी 107 धावांच लक्ष्य ठेवलं होतं.
टीम इंडियाने 20 चेंडू राखून आरामात हे लक्ष्य पार केलं. केएल राहुल नाबाद 51 आणि सूर्यकुमार यादवने नाबाद 50 धावांची खेळी केली. भारताकडून दीपक चहर व अर्शदीप सिंग यांनी सुरेख गोलंदाजीचा मारा केला. दोघांनीही पहिल्या 2.3 षटकात दक्षिण आफ्रिकेचे पाच गडी बाद केले. त्यानंतर ऐडन मार्करम व वेन पार्नेल यांनी संघाचा डाव सावरला. ते अनुक्रमे 25 व 24 धावा करत बाद झाले.
निम्या षटकानंतर दक्षिण आफ्रिका संकटात सापडली होती पण केशव महाराजने एक बाजू लढवत ठेवत त्याने 35 चेंडूत 41 धावा केल्या. आफ्रिकेची फलंदाजी ही सुमार दर्जाची झाली असून पत्त्याच्या बंगल्यासारखी त्याचे गडी बाद झाले. भारताकडून अर्शदीप सिंगने 32 धावा देत 3 बळी टिपले. दीपक चहर आणि हर्षल पटेलने प्रत्येकी 2-2 बळी घेत त्याला सुरेख साथ दिली.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.