

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी २० मालिका उद्यापासून
कॅनबेरा येथे पहिला टी २० सामना होणार
भारताच्या यंग ब्रिगेडसमोर तगड्या ऑस्ट्रेलियाचं आव्हान
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या लढतीत कशी असेल प्लेइंग ११
ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधीच भारतानं आशिया कप २०२५ जिंकला होता. ही स्पर्धा टी २० फॉरमॅटमध्ये झाली होती. जवळपास आशिया कप जिंकणारा संघच ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी २० मालिका खेळणार आहे. त्यामुळं टीम इंडियासाठी ही जमेची बाजू आहे.
भारताकडून सलामीला विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा आणि वनडेचा कर्णधार शुभमन गिल उतरण्याची शक्यता आहे. अखेरच्या वनडेमध्ये भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. ऑस्ट्रेलियातील ही विजयाची मालिका टी २० चा पहिला सामना जिंकून सुरूच ठेवण्याचा टीम इंडियाचा मानस असेल.
ऑस्ट्रेलियानं वनडे मालिकेत भारताला पराभूत केलं आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाला अपयश आलं असलं तरी आता पाच सामन्यांची टी २० मालिका उद्यापासून सुरू होत आहे. पहिली टी २० लढत कॅनबेरा येथे होणार आहे. हा सामना जिंकून मालिकेची सुरुवात गोड व्हावी, अशी तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान मोडून काढावं लागणार आहे. त्यामुळं तसाच तगडा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या लढतीसाठी निवडावा लागणार आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी २० मालिकेत दमदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे. मागील टी २० वर्ल्डकपमधील अंतिम सामना जिंकून भारतानं जेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर टी २० मध्ये भारतीय संघानं सातत्य ठेवलं आहे. हीच विजयी मालिका ऑस्ट्रेलियातही कायम राहील, अशी अपेक्षा आहे.
भारतीय संघाची निवड समिती आणि व्यवस्थापनानंही आशिया कप जिंकणाऱ्या प्रमुख खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी २० मालिकेसाठी संधी दिली आहे. वॉशिंग्टन सुंदरलाही या चमूमध्ये स्थान दिलं आहे. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी टीम इंडियाच्या डावाची सुरुवात करेल. पहिल्या सहा षटकांत हे दोन्ही हुकमी फलंदाज चांगली सुरुवात करून देतील अशी आशा आहे. अभिषेक शर्मा चांगला फॉर्मात आहे. शुभमन गिलला हवा तसा सूर गवसला नाही, मात्र तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरी करून टी २० मधील धावांचा दुष्काळ संपवेल अशी अपेक्षा आहे.
मधल्या फळीत कर्णधार सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंह आणि अक्षर पटेल ही यंग ब्रिगेड आहे. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यात धावांची गती राखण्याची क्षमता आहे. तर शिवम दुबे हा मॅचविनर आहे. तो दबावात अत्यंत बहारदार फलंदाजी करतो. तर रिंकू सिंह हा आणखी एक मॅचविनर फलंदाज संघात आहे. टी २० फॉरमॅटमध्ये विस्फोटक फलंदाजी करून संघाला विजय मिळवून देण्याची क्षमता त्याच्यात आहे. पण बऱ्याच काळापासून त्याला संघात पक्कं स्थान मिळू शकलेलं नाही. पण जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते, त्या त्या वेळी त्यानं चमकदार कामगिरी केली आहे. तळापर्यंत फलंदाजी असलेल्या भारतीय संघात ऑस्ट्रेलियात त्यांच्याच संघाला पराभूत करण्याची क्षमता आहे.
हर्षित राणा, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्या समावेशानं भारतीय गोलंदाजीला धार आली आहे. वनडे मालिकेत विश्रांती घेतलेला बुमराह संघात असल्यानं ताकद वाढली आहे. हर्षित राणा त्याला साथ देईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या वनडे सामन्यात त्यानं चार विकेट घेऊन आपली क्षमता सिद्ध केली होती. प्लेइंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या दोघांना खेळवतील. तर गरज पडली तर पाचवा स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून शिवम दुबेला आजमावून बघितलं जाऊ शकतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.