IND vs WI Day-1 Highlights: आधी सिराज अन् बुमराहनं कंबरडं मोडलं, नंतर राहुलनं कुटलं; वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या दिवशी भारताचं पारडं जड

Ahmedabad Test Day 1, Ind vs WI score update : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल चमकले. वेस्ट इंडीजचा पहिला डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपला. त्यानंतर राहुलनं अर्धशतकी खेळी करून भारताचं वर्चस्व कायम ठेवलं.
वेस्ट इंडीजविरुद्ध भारताचं पारडं जड, पहिल्या दिवशी २ बाद १२१ धावा
ahmedabad Test 1 day ind vs WIsaam tv
Published On
Summary
  • अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडीज कसोटी सामना

  • पहिल्याच दिवशी भारताचं पारडं जड

  • वेस्ट इंडीजला १६२ धावांवर गुंडाळलं

  • जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज चमकले, केएल राहुलची फिफ्टी

आशिया कप स्पर्धेत चमकदार कामगिरी करून विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघानं वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी सामन्यातही आपला दबदबा कायम ठेवला आहे. पहिल्याच कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजांनी वेस्ट इंडीजच्या फलंदाजीचं कंबरडं मोडून टाकलं. तर फिरकीपटू कुलदीप यादवनं आपल्या फिरकीवर नाचवलं. त्यामुळं वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपला.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेस्ट इंडीजनं टॉस जिंकला आणि पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण तो निर्णय त्यांच्याच अंगलट आला. डावाची सुरुवातच धडपडत झाली. अर्धा संघ फक्त ९० धावांत माघारी परतला. तर सिराज, बुमराहच्या माऱ्यानं घायाळ झालेल्या वेस्ट इंडीजचा डाव ४५ व्या षटकांतच १६२ धावांवर गुंडाळला. त्यानंतर भारताकडून केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल मैदानात उतरले. त्यांनी डावाची सुरुवात चांगली केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतानं २ विकेट गमावून १२१ धावा केल्या. केएल राहुलनं अर्धशतकी खेळी केली. वेस्ट इंडीज अजूनही ४१ धावांनी आघाडीवर आहे.

केएल राहुलची संयमी अर्धशतकी खेळी

भारतीय संघाला केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली. तिसऱ्या सत्रात पावसाच्या व्यत्ययामुळं काही वेळ खेळ थांबवावा लागला. ब्रेकच्या आधी यशस्वी ४ धावांवर खेळत होता. पाऊस थांबला, पण यशस्वीनं हल्ला सुरू केला. १५ व्या षटकात जस्टीन ग्रीव्जच्या गोलंदाजीवर तो तुटून पडला. या षटकात त्यानं तीन चौकार मारले. राहुल आणि यशस्वी यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. यशस्वी ३६ धावांवर जायडेन सिल्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. राहुलसोबत त्यानं ६८ धावांची भागीदारी केली.

साई सुदर्शन सपशेल अपयशी ठरला. अवघ्या ७ धावा करून तो रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिलनं संघाचा डाव सावरला. राहुलने १०१ चेंडू खेळून काढले आणि अर्धशतक साजरं केलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा राहुल ५३ तर कर्णधार गिल १८ धावांवर नाबाद होता.

वेस्ट इंडीजची फलंदाजी ढेपाळली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत मानहानीकारक पराभव पत्करावा लागलेला वेस्ट इंडिजचा संघ भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातही विशेष काही करू शकला नाही. भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे फलंदाजी ढेपाळली. सलामीवीर चंद्रपॉल शून्यावर बाद झाला. त्यानंतर ठराविक अंतरानं एकेक गडी बाद होत गेला. जस्टिन ग्रीव्ज यानं ३२, शाय होप यानं २६ आणि कर्णधार रॉस्टन चेज यानं २४ धावा केल्या.

वेस्ट इंडीजविरुद्ध भारताचं पारडं जड, पहिल्या दिवशी २ बाद १२१ धावा
कुलदीप यादवचा मॅजिक बॉल, फलंदाजाच्या दांड्या गुल; बाद कधी झाला कुणालाच कळलं नाही, VIDEO

भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी वेस्ट इंडीजच्या फलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. सुरुवातीला सिराज बुमराहपेक्षा धारधार गोलंदाजी करत होता. सिराजने १४ षटके फेकली. ४० धावा देत ४ विकेट घेतल्या. तर बुमराहने १४ षटकांत ४२ धावा देत ३ गडी तंबूत धाडले. कुलदीप यादवने २५ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरने एक गडी बाद केला.

वेस्ट इंडीजविरुद्ध भारताचं पारडं जड, पहिल्या दिवशी २ बाद १२१ धावा
अभिषेक शर्मानं रचला इतिहास, ICC रँकिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; कुणालाही जमलं नाही ते करून दाखवलं!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com