
Ind Vs Eng 3rd Test Result : भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी इंग्लंडने जिंकली आहे. सामन्यामध्ये भारताचा २२ धावांनी पराभव झाला आहे. तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला ७४ व्या ओव्हरमध्ये शोएब बशीरने मोहम्मद सिराजला बाद केले आणि सामना संपला. या विजयामुळे इंग्लंडने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये २-१ अशी आघाडी घेतली आहे.
लीड्स आणि एजबॅस्टनप्रमाणेच लॉर्ड्स कसोटीतही बेन स्टोक्सने टॉस जिंकला. मात्र, यावेळी त्याने पहिल्यांदा गोलंदाजी न करता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, पहिल्या दिवशी इंग्लंडचे फलंदाज मैदानात उतरले आणि दुसऱ्या दिवसअखेर त्यांचा डाव ३८७ धावांवर संपुष्टात आला. या डावात जो रूटने शतक झळकावले. त्याला जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्सची साथ मिळाली. दोघांनी अर्धशतकीय खेळी केली. भारतासाठी जसप्रीत बुमराहने जबरदस्त कामगिरी करत ५ विकेट्स घेतल्या. त्याच्यापाठोपाठ मोहम्मद सिराज आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.
भारताचा पहिला डाव सुरू झाला तेव्हा यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल लवकर बाद झाले. मात्र, केएल राहुलने जबाबदारी सांभाळत शतक ठोकले. त्यानंतर रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी ७० पेक्षा जास्त धावा केल्या. भारतही ३८७ धावांवर ऑलआउट झाला. ख्रिस वोक्सने ३ विकेट्स घेतल्या. बेन स्टोक्स आणि ब्रायडन कार्स यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.
दुसऱ्या डावात भारताच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले. इंग्लंडकडून जो रूटने पुन्हा सर्वाधिक धावा केल्या. तो ४० धावांवर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ कर्णधार बेन स्टोक्सने ३३ धावा जोडल्या. भारतासाठी वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ४ बळी घेतले, तर मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. आकाश दीप आणि नितीश कुमार रेड्डीने प्रत्येकी १-१ गडी बाद करत इंग्लंडचा डाव १९२ धावांवर संपवला.
१९३ धावांचे लक्ष्य असताना यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल फलंदाजीसाठी चौथ्या दिवशी मैदानात उतरले. यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद झाला. त्यानंतर करुण नायर आणि शुभमन गिलही लवकर माघारी परतले. नाईट वॉचमॅन आकाश दीप एक धाव करुन बाद झाले. पाचव्या दिवसाच्या सुरुवातीलाच रिषभ पंत क्लीनबोल्ड झाला. त्याच्यापाठोपाठ संयमी केएल राहुल एलबीडब्लू बाद झाला. लगेच वॉशिंग्टन सुंदर कॅचआउट झाला. एका बाजूला विकेट पडत असताना रवींद्र जडेजा भिंतीप्रमाणे टिकून खेळला. आधी नितीशकुमार रेड्डी, नंतर जसप्रीत बुमराह आणि शेवटी मोहम्मद सिराजसोबत त्याने खेळ पुढे नेला. रवींद्र जडेजाने अर्धशतकीय खेळी केली. पण तिसऱ्या सत्राच्या शेवटी इंग्लंडला सिराजची विकेट मिळाली आणि इंग्लंडने बाजी मारली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.