नागपूर : राज्याचा सर्वोच्च छत्रपती क्रीडा पुरस्कार मिळालेल्या नागपुरातील एका खेळाडूची सरकारनं उपेक्षा केलीय. राष्ट्रीय आट्यापाट्या खेळात या खेळाडूनं दीड दशकाच्या कारकिर्दीत १५ च्या वर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्त्व केलं. आठ सुवर्णांसह अनेक पदके आणि पुरस्कार जिंकले. त्याउपरही त्याला ‘स्पोर्टस’ कोट्यातून नोकरी मिळाली नाही. त्यामुळं कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी नाइलाजानं त्याला तुटपुंज्या पगारावर पेट्रोलपंपावर काम करावं लागतंय. (In Nagpur, the 'Chhatrapati' award winning player is working at a petrol pump)
हे देखील पहा -
चुनाभट्टी परिसरात राहणाऱ्या या खेळाडूचं नाव आहे प्रवीण वहाले. प्रवीण आट्यापाट्यासोबत दर्जेदार खो-खोपटूही आहे. विपरीत परिस्थिती असूनही त्याने आट्यापाट्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर आणि खो-खोमध्ये राज्य स्तरापर्यंत झेप घेतली. जवळपास दीड दशकांच्या कारकिर्दीत प्रवीणनं सबज्युनियर, ज्युनिअर आणि सिनिअर गटात १५ च्या वर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकं जिंकली. आपल्या अष्टपैलू कामगिरीनं दिल्लीपासून हैदराबादपर्यंत आणि मुंबईपासून देहरादूनपर्यंत देशभरातील असंख्य मैदाने गाजविली. क्रीडा क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल २००६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते त्याचा प्रतिष्ठेचा छत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्या आधारावर प्रवीणनं नोकरीसाठी ‘स्पोर्टस’ कोट्यातून रेल्वे, बॅंक, मनपासह ठिकठिकाणी अर्ज केले. अधिकारी, महापौर व क्रीडामंत्र्यांचे उंबरठे झिजविले. मात्र, कुणीही त्याची दखल घेतली नाही.
बारावीपर्यंत शिकलेला प्रवीण सात-आठ महिन्यांपूर्वी इलेक्ट्रिक, नळ फिटिंग आणि पेटिंगची कामे करून उदरनिर्वाह करीत होता. ही कामे करताना दोनशे ते पाचशे रुपये मिळत होते तर कधी काम न मिळाल्यानं काहीच नाही. कोरोनाकाळात काम मिळेनासे झाल्यानं अखेर एका पेट्रोलपंपावर रोजमजुरीचं काम सुरू केलं. आठ ते दहा तास मेहनत केल्यानंतर प्रवीणला जेमतेम आठ हजार रुपये मिळतात. एवढ्याशा कमाईत संसार चालविताना त्याला खूप त्रास होत आहे. मात्र, नाइलाज असल्याचं त्यानं सांगितलं. दहा बाय दहाच्या एका खोलीच्या घरात राहणाऱ्या ४४ वर्षीय प्रवीणला पत्नी, मुलगी व म्हातारी आई आहे. घरात तो एकटाच कमविता आहे. मुंबईत झालेल्या आकर्षक समारंभात टाळ्यांच्या कडकडाटात मुख्यमंत्र्यांनी प्रवीणचा छत्रपती पुरस्कार यथोचित सन्मान केला. या पुरस्काराने आतापर्यंत शेकडो खेळाडूंच्या घराची शान वाढविली. मात्र प्रवीणच्या घरी ही ट्रॉफी अक्षरशः धुळखात पडून आहे. माझ्यासारख्या गरीब व्यक्तीला पुरस्कार नव्हे, नोकरीची खरी गरज आहे, असं प्रवीण सांगतो.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये छत्रपती पुरस्कार विजेत्यांना नगर परिषदांमध्ये थेट नोकऱ्या देण्यात आल्याची माहिती आहे. त्या आधारावर प्रवीणचाही गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. एका ‘चॅम्पियन’ खेळाडूची शासन अशाप्रकारे उपेक्षा करीत असेल तर, भविष्यात राज्यात कसे काय खेळाडू घडतील, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केला जात आहे. खेळात करिअर करण्यास इच्छुक तरुणांसाठी ही निश्चितच चिंतेची गोष्ट आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.