

एकीकडे भारतानं श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला असताना, दुसरीकडं आयसीसीनं कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यावेळच्या क्रमवारीत मोठी उलथापालथ झाल्याचं बघायला मिळालं. बऱ्याच दिवसांपासून फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या ट्रॅव्हिस हेडला मोठा फटका बसला आहे. त्याच्या कसोटी क्रमवारीतील वर्चस्वाला धक्का बसला आहे. तो पहिल्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानी पोहोचला आहे. तर सर्वाधिक फायदा इंग्लंडच्या हॅरी ब्रुकला झाला आहे. तो पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. तर जो रूट आणि स्टीव्ह स्मिथ यांनाही थोडा फार याचा फायदा मिळाला आहे.
आयसीसी कसोटी क्रमवारीत आता इंग्लंडचा स्फोटक फलंदाज हॅरी ब्रुक हा क्रमांक एकवर पोहोचला आहे. यावेळच्या रँकिंगमध्ये त्याला एका स्थानाचा फायदा झाला. त्याचे रेटिंग सध्या ८५२ आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटनेही एका स्थानाने झेप घेतली. तो आता ८४० रेटिंगसह दुसऱ्या स्थानी पोहोचला. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथही एक पाऊल पुढे सरकला आहे. तो तिसऱ्या स्थानी असून, त्याचे रेटिंग सध्या ८३३ आहे.
बराच काळ कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेला ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड चौथ्या स्थानी घसरला आहे. तो आता तीन स्थानांच्या घसरणीसह थेट चौथ्या स्थानी पोहोचलाय. त्याचे रेटिंग ८१९ आहे. दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार टेम्बा बावुमा ७७५ रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे.
यादरम्यान भारतीय संघाच्या फलंदाजांच्या रँकिंगवर कोणताही परिणाम झालेला नाही. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल ७४३ रेटिंगसह सातव्या स्थानी आहे. तर यशस्वी जयस्वाल ७३३ रेटिंगसह नवव्या स्थानी आहे. पाकिस्तानचा बाबर आझम ७१६ रेटिंगसह दहाव्या क्रमांकावर आहे.
भारतीय फलंदाजांची रँकिंग बदलली नाही. कारण भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामन्याचा निकाल आज, बुधवारी लागला. भारतानं या सामन्यात मोठा विजय मिळवला. तर भारतीय फलंदाजांनीही चांगली कामगिरी केली आहे. मात्र, या वेळच्या रँकिंगमध्ये या कामगिरीचा समावेश झालेला नाही. ही ताजी रँकिंग १८ ऑगस्टपर्यंत अपडेट करण्यात आली आहे. भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याचा निकाल लागला असून, आगामी रँकिंगमध्ये भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांच्या कामगिरीची दखल घेतली जाईल, असे सांगण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.