Hardik Pandya Statement: मुंबईच्या पराभवाला कारणीभूत कोण? हार्दिक पंड्याने स्पष्टच सांगितलं
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला २० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटकअखेर ४ गडी बाद २०६ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघाला ६ गडी बाद १८६ धावा करता आल्या. या पराभवानंतर हार्दिक पंड्याने पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे.
सामन्यानंतर बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला की, ' निश्चितच आव्हान गाठता येऊ शकलं असतं. मात्र चेन्नई सुपर किंग्ज संघातील गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. सीएसकेचा प्लान चांगला होता. त्यांनी मोठ्या बाऊंड्रीचा खूप चांगल्या प्रकारे वापर केला. सीएसकेने विजय मिळवला कारण यष्टीच्या मागे एक व्यक्ती ( एमएस धोनी) होता, जो त्यांना सांगत होता की, नेमकं काय करायचं आहे.'
तसेच तो पुढे म्हणाला की, ' चेंडू थांबून येत होता त्यामुळे चेन्नईचा संघ पुढे निघाला. पथिराना गोलंदाजीला येण्यापूर्वी आम्ही सामन्यात टिकून होतो. त्यानंतर आम्ही बॅकफूटवर गेलो. आम्ही शिवम दुबेविरुद्ध खेळताना फिरकी गोलंदाज लावण्याचा विचार केला. मात्र या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना खेळून काढणं कठीण होतं. आता आमचे पुढील सामने बाहेर होणार आहेत. जर आम्ही स्मार्ट असू तर आम्ही जे ठरवलं आहे ते मिळवून दाखवू.'
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत या स्पर्धेत ६ सामने खेळले आहेत. यादरम्यान मुंबईला केवळ २ सामने जिंकता आले आहेत. तर ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना पंजाबविरुद्ध होणार आहे. मुंबईचा संघ कुठल्याही परिस्थितीत हा सामना जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मात्र पंजाब किंग्जला त्यांच्याच घरात जाऊन पराभूत करणं सोपं नसेल. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.