Happy Birthday Sunil Gavaskar : सुनील गावसकर यांच्या टॉप १० इनिंग; क्रिकेटचा सुवर्णकाळ झर्रकन डोळ्यांसमोरून जाईल!

Sunil Gavaskar Birthday : सुनील गावसकर यांनी क्रिकेटचं मैदान गाजवलं. क्रिकेटच्या इतिहासातील त्यांच्या सर्वोत्तम १० खेळी. एकदा वाचा!
महान क्रिकेटपटू सुनील गावसकर
Sunil GavaskarSAAM TV

क्रिकेटचा इतिहास जेव्हा जेव्हा सांगितला जाईल, तेव्हा सुनील गावसकर हे सुवर्णाक्षरांनी लिहिलेलं पान उलगडल्याशिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, सलामीवीर, विक्रमादित्य, लिटिल मास्टर अशी ख्याती असलेल्या सुनील गावसकर यांनी ७५ व्या वर्षात पदार्पण केलंय. या महान क्रिकेटपटूच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या १० अविस्मरणीय इनिंगवर एक नजर.

खेळपट्टी कशीही असो, तिचा मूड आपल्या फलंदाजीप्रमाणं आणि मनासारखं वळवून घेणारे, समोरच्या गोलंदाजाला धडकी भरवणारे आणि वेगानं आलेला चेंडू असो की फिरकीनं गिरकी घ्यायला लावणारा चेंडू असो, तो तंत्रशुद्ध फलंदाजीनं डिफेन्स करणारे सुनील गावसकर 'याचि देहि...' अनुभवण्याचं आणि बघण्याचं भाग्य कोट्यवधी क्रिकेटरसिकांना मिळालं.

महान क्रिकेटपटू सुनील गावसकर
Sunil Gavaskar On Rohit Sharma: रोहितला हा बदल करावाच लागेल! पहिल्या कसोटीपूर्वी गावसकर हिटमॅनबाबत काय म्हणाले?

सुनील गावसकर यांनी १२५ कसोटी आणि १०८ वनडे सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं. कसोटी कारकीर्दीत गावसकर यांनी १०१२२ धावा केल्या. सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नाबाद २३६ होती. तर त्यांनी एकूण ३४ शतके आणि ४५ अर्धशतके ठोकली आहेत. तर वनडेमध्ये ३०९२ धावा केल्या. सर्वोच्च धावसंख्या १०३ होती.

मुंबईत जन्मलेल्या गावसकर यांनी ३४८ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत २५८३४ धावा केल्या आहेत. त्यात ८१ शतके आणि १०५ अर्धशतके आहेत. विशेष म्हणजे त्यांनी त्रिशतकही झळकावलं आहे.

महान क्रिकेटपटू सुनील गावसकर
Sunil Gavaskar: फॅन गर्लच्या प्रेमात पडली सुनील गावसकरांची विकेट;घराचा पत्ता शोधून घातली लग्नाची मागणी!वाचा किस्सा

नाबाद २३६ धावा

१९८३ मध्ये वेस्ट इंडीज संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. मालिकेतील सहावा आणि अंतिम सामना चेन्नईत झाला होता. गावसकर यांनी या सामन्यात नाबाद २३६ धावा केल्या होत्या. कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूनं केलेल्या सर्वाधिक धावा होत्या. ४२५ चेंडू खेळले होते. तर तब्बल ६४४ मिनिटं ते मैदानात होते. सुरुवातीचे दोन फलंदाज संघाची धावसंख्या शून्यावर असताना बाद झाले होते. गावसकर त्यावेळी चौथ्या स्थानावर खेळायला आले होते. भारतानं हा सामना अनिर्णित राखला होता. मात्र, ही मालिका ३-० अशी गमावली होती.

मैदानात ५२९ मिनिटं आणि २२० धावा

१९७१ मध्ये भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर होते. अखेरचा कसोटी सामना होता. हा सामना अनिर्णित राखून यजमान संघावर मालिकाविजय मिळवायचा होता. गावसकरांचा पहिलाच सामना होता. त्यांनी दुसऱ्या डावात २२० धावा कुटल्या. तब्बल ५२९ मिनिटं ते मैदानावर होते. ही मालिका भारतानं १-० अशी जिंकली होती.

बलाढ्य वेस्ट इंडीज संघ आणि गावसकरांचं शतक

१९७१ मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथील याच कसोटीत गावसकर यांनी तुफान फटकेबाजी केली होती. या अप्रतिम खेळीत त्यांनी ११ चौकार तडकावले होते. भारतानं पहिल्या डावात ३६० धावा केल्या होत्या.

अवर्णनीय नाबाद १०३ धावा

१९८७ साली वनडे वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध सामना झाला होता. सुनील गावसकर यांनी जबरदस्त फटकेबाजी करत, शतक झळकावलं होतं. कानपूरच्या सामन्यात भारतानं २२२ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. सलामीवीर गावसकर यांनी अवघ्या ८८ चेंडूत १० चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद १०३ धावा कुटल्या होत्या. गावसकर यांच्या तुफान खेळीच्या जोरावर भारतानं सेमिफायनलमध्ये प्रवेश केला होता.

अविस्मरणीय द्विशतक

सुनील गावसकर यांनी १९७९ साली इंग्लंडविरुद्ध केलेली खेळी अविस्मरणीय अशीच आहे. त्यांनी २२१ धावा केल्या होत्या. भारताला विजयासाठी ४३८ धावा करायच्या होत्या. पण भारतीय संघाला अवघ्या ९ धावा कमी पडल्या. पण ओव्हलच्या मैदानावर भारतानं हा सामना अनिर्णित राखला. याच सामन्यात चेतन चव्हाण यांनी ८० धावा, तर दिलीप वेंगसरकर यांनी ५२ धावा केल्या होत्या. तब्बल ४९० मिनिटं ते मैदानात होते. या खेळीत २१ चौकार मारले होते.

गावसकरांसमोर खेळपट्टीही दमली!

सुनील गावसकर यांची धावांची भूक कमालीची होती. वेस्ट इंडीजच्या भेदक गोलंदाजीसमोर तर त्यांची बॅट तळपायची. १९७६ मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये झालेल्या सामन्यातही त्यांनी ही लय कायम राखली होती. ४०३ धावांचं टार्गेट होतं. गावसकर सलामीला आले होते. खेळपट्टी खूपच संथ आणि फलंदाजीसाठी खडतर होती. तरीही गावसकरांनी आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीनं खेळपट्टीलाही खेळवलं. १०२ धावा त्यांनी कुटल्या. विजयाचा मार्ग सोपा करून दिल्यानंतर गुंडप्पा विश्वनाथ यांनी शतकी खेळी करत विजयी कळस रचला.

गावसकरांनी खेळपट्टीही 'खेळू' लागली!

१९८७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना झाला होता. बेंगळुरूची खेळपट्टी भारतीय फलंदाजांसाठीच घातक ठरली होती. इतर सर्व फलंदाज ढेपाळले असताना, गावसकर हे पहाडासारखे मैदानात उभे राहिले. २२१ धावांचं आव्हान होतं. एकट्या गावसकर यांनी ९६ धावा कुटल्या. ३२० मिनिटं ते मैदानात टिच्चून उभे होते. २६४ चेंडूंचा सामना त्यांनी केला होता.

बलाढ्य ऑस्ट्रेलियाला रडवलं

१९७७ मध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला गावसकर यांनी अक्षरशः रडवलं. ३४१ धावांचं आव्हान होतं. खऱ्या अर्थानं गावसकर यांनी या सामन्यात रंगत आणली. ब्रिस्बेनच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी पहिलं कसोटी शतक ठोकलं. इतर सहकाऱ्यांची साथ मिळाली नाही आणि भारताला १७ धावा कमी पडल्या.

पाकिस्तानी गोलंदाजांची काढली पिसं

१९८३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी खेळताना गावसकर यांनी नाबाद १२७ धावा केल्या. इम्रान खानच्या भेदक माऱ्यासमोर बाकीच्या फलंदाजांना कमाल दाखवता आली नव्हती. पण एकटे गावसकर यांनी हा भेदक मारा ठेचून काढला होता.

वेस्ट इंडीजविरुद्ध पुन्हा तळपले

१९८३ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात गावसकर यांनी १२१ धावा केल्या. वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांचा खोचक आणि तुफानी मारा परतावून लावत त्यांनी अवघ्या ९४ चेंडूंत शतकी खेळी केली. त्यावेळी हे पाचवे सर्वात वेगवान कसोटी शतक होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com