Mohammed Shami Comeback: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला. मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
यासह न्यूझीलंडने कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारतीय संघाला मालिका बरोबरीत आणण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत मोहम्मद शमी हा भारतीय संघातील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाल्यानंतर संघात आलेला शमी, या स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला होता.
या स्पर्धेनंतर तो दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला. आता वर्ष उलटूनही तो भारतीय संघात कमबॅक करु शकलेला नाही. दरम्यान ईएसपीएनक्रीकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, शमी आगामी बॉर्डर - गावसकर ट्रॉफीतून भारतीय संघात कमबॅक करु शकतो.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना झाल्यानंतर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात शमी गोलंदाजी करताना दिसतोय. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ लवकर आटोपला.
त्यानंतर दुपारी २:३० च्या दरम्यान शमीने सरावाला सुरुवात केली. तर ३:५० पर्यंत तो गोलंदाजी करत होता. आधी त्याने भारतीय संघाचा सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरला गोलंदाजी केली. त्यानंतर शुभमन गिललाही गोलंदाजी केली. यावेळी गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल देखील त्याची गोलंदाजी पाहत होता.
गोलंदाजी करताना शमीच्या पायाला पट्टी होती. मात्र तो फिट असल्याचे दिसून आले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिका झाल्यानंतर भारतीय संघ बॉर्डर- गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे.
हा दौरा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी भारतीय संघाला कुठल्याही परिस्थितीत कमीत कमी ३ सामने जिंकणं गरजेचं आहे. त्यासाठी शमीसारखा अनुभवी गोलंदाज संघात असणं गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.