Chetan Sharma:चेतन शर्मा यांनी बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या चेतन शर्मा यांनी झी न्यूजच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतीय संघाबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले होते.
त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. चेतन शर्मा यांची दुसऱ्यांदा निवड समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र अवघ्या ४२ दिवसांत त्यांची कारकीर्द संपुष्टात आली आहे. तसेच क्रिकेटपटू म्हणून देखील त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं आहे.
चेतन शर्मा हे १९८३ मध्ये भारतीय संघासाठी आपला पहिला वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. या सामन्यात त्यांनी ३ गडी बाद केले होते. मात्र ६० धावा खर्च करत ते सर्वात महागडे गोलंदाज ठरले होते.
त्यांनतर १९८४ मध्ये त्यांना भारतीय कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. ज्यावेळी त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरूवात केली त्यावेळी त्यांचे वय केवळ १८ वर्ष होते.
हॅट्ट्रिक घेणारे पहिले भारतीय गोलंदाज..
चेतन शर्मा यांनी १९८७ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात सलग ३ चेंडूंमध्ये ३ गडी बाद केले होते. यासह त्यांनी अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घेतली होती. ते वर्ल्ड क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारे पहिलेच गोलंदाज ठरले होते.
तसेच भारतीय संघासाठी देखील पहिली हॅट्ट्रिक घेण्याचा विक्रम हा चेतन शर्मा यांच्या नावे आहे. ही क्रिकेटच्या इतिहासातील पहिली हॅट्ट्रिक होती, ज्यामध्ये गोलंदाजाने तीनही विकेट्स त्रिफळाचित करत मिळवल्या होत्या.
एक खराब चेंडू आणि पडला टीकेचा पाऊस..
ऑस्ट्रल- आशिया चषक १९८६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात पाकिस्तान संघाला विजय मिळवण्यासाठी २४६ धावांची आवश्यकता होती. या सामन्यात सुनील गावसकर यांनी ९२, के श्रीकांत यांनी ७५ तर दिलीप वेंगसरकर यांनी ५० धावांची खेळी केली होती.
या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. अवघ्या ९ धावांवर पाकिस्तानचा पहिला फलंदाज बाद झाला होता. तर २४१ धावांवर पाकिस्तानचा ९ वा फलंदाज बाद झाला होता.
जावेद मियांदाद शतकी खेळी करून खेळपट्टीवर टिकून होते. पाकिस्तानला अजूनही जिंकण्यासाठी ५ धावांची आवश्यकता होती. शेवटच्या चेंडूवर जावेद मियांदाद यांनी षटकार मारला आणि पाकिस्तानला विजय मिळवून दिला.
या षटकारनंतर जावेद मियांदाद हिरो ठरले. तर चेतन शर्मा यांच्यावर टीकांचा वर्षाव केला गेला होता.
खेळाडूंसाठी देव माणूस..
चेतन शर्मा यांनी बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याचं कारण असं की, त्यांनी झी न्यूजच्या एका स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतीय खेळाडूंबद्दल धक्कादायक खुलासा केला होता.
त्यापैकीच एक खुलासा म्हणजे, जो खेळाडू निवडकर्त्यांचा आवडता खेळाडू असतो त्याला भारतीय संघात हमखास संधी मिळते. त्यामुळे निवडकर्त्यांच्या घरी खेळाडूंच्या भेटी गाठी सुरु असतात असं चेतन शर्मा यांनी म्हटलं होतं.
त्यामुळे ज्या खेळाडूंची निवड चेतन शर्मांच्या शिफारशीमुळे होते त्यांच्यासाठी चेतन शर्मा हे देव माणूस आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.