फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पॅरिस ऑलिंपिक २०२४ स्पर्धेचा थरार सुरु आहे. ब्राझीलची जलतरणपटू आना कॅरोलीना विएरा हिला या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे. आना कॅरोलीना विएराने ही ब्राझीलच्या 4x100m फ्रीस्टाइल रिले संघाचा भाग होती. मात्र ही स्पर्धा सुरु असताना तिने स्पर्धेच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. ही स्पर्धा सुरु असताना, खेळाडूंना ऑलिंपिक गावाच्या बाहेर जाण्यावर बंदी आहे. मात्र ती आपला प्रियकर आणि सहाकारी जलतरणपटू गॅब्रिएल सॅंटोससोबत गावातून बाहेर पडली. यामुळे तिला घरी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, हे खेळाडू आपल्या इव्हेंटच्या आदल्या रात्री नियमांचं उल्लंघन करत गावातून बाहेर पडले होते. तिने या नाईट आऊटचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आणि ती बाहेर असल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. इथेच तिची चोरी पकडली गेली. दरम्यान ब्राझीलचा महिला आणि पुरुषांचा 4x100m फ्रीस्टाइल संघ अंतिम फेरीत पोहचू शकलेला नाही.
या घटनेची माहिती मिळताच ब्राझीलच्या ऑलिंपिक कमिटीने तात्काळ अॅक्शन घेतली आहे. विएराला घरी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर सँटोसने आपली चूक मान्य करत माफी मागितली आहे. त्यामुळे त्याला घरी न पाठवा वॉर्निंग देण्यात आली आहे.
ब्राझीलच्या जलक्रीडा महासंघाच्या (CBDA) मते, COB ने गेल्या शुक्रवारी कुठलीही परवानगी न घेता ऑलिंपिक गाव सोडल्याबद्दल दोन्ही खेळाडूंवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. गॅब्रिएल सॅंटोसला इशारा देण्यात आला आहे. तर आना कॅरोलीनाने ब्राझीलच्या जलतरण समितीने घेतलेल्या निर्णयाचा विरोध केला, त्या निर्णयाचा स्वीकार केला नाही. त्यामुळे तिला तात्काळ ब्राझीलला परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'