वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत न्यूझीलंडने दमदार सुरुवात केली होती. सुरुवातीच्या ४ सामन्यांमध्ये विजय मिळवत न्यूझीलंडने गुणतालिकेत आघाडी घेतली होती. मात्र पुढील ३ सामन्यांमध्ये न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान न्यूझीलंडचा संघ अडचणीत असताना संघातील प्रमुख गोलंदाज स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
वर्ल्डकप स्पर्धेतील महत्वाचे सामने शिल्लक असताना न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. संघतील गोलंदाज मॅट हेन्री दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी काईल जेमिसनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान गोलंदाजी करत असताना हॅमस्ट्रिंगमुळे मैदान सोडावं लागलं होतं. आता एमआरआय स्कॅन केल्यानंतर ही दुखापत गंभीर असल्याचं समोर आलं आहे.
मॅट हेन्रीची दुखापत गंभीर असून त्याला पूर्णपणे ठीक व्हायला दोन ते चार आठवड्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे त्याला संघाबाहेर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Matt Henry Ruled Out)
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर न्यूझीलंडच्या टीम मॅनेजमेंटला कल्पना होती की, या दुखापतीतून तो लवकर सावरु शकणार नाही.
त्यामुळे बॅकअप म्हणून त्यांनी काईल जेमिसनला भारतात बोलावून घेतलं. तो गुरुवारी संघासोबत जोडला गेला असून त्याने बंगळुरुत न्यूझीलंड संघासोबत सराव करायला सुरुवात केली आहे. (Latest sports updates)
दुखापतीचं सत्र काही थांबेना...
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन दुखापतीमुळे खेळताना दिसून येत नाही. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळू शकला नव्हता.
जिमी निशम देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या दुखापतीचं सत्र काही थांबताना दिसत नाहीये.
न्यूझीलंडचा संंघाच्या वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर या संघाने ७ सामने खेळले आहेत. यापैकी ४ सामन्यांमध्ये विजय संपादन करता आला आहे. तर ३ सामन्यांमध्ये न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ८ गुणांसह न्यूझीलंचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.