
ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी १४ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. तर दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार गोलंदाज आणि कर्णधार भारत विरुद्धच्या वनडे आणि टी -२० मालिकेतून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार पॅट कमिन्सला पाठीच्या दुखापतीमुळे भारत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे. पॅट कमिंसचे संघाबाहेर जाणे हा ऑस्ट्रेलिया संघासाठी मोठा झटका आहे तर भारतासाठी आनंदाची बातमी आहे. ही मालिका ऑक्टोबर महिन्यात खेळली जाणार आहे.
पॅट कमिन्स भारताविरुद्धच्या मालिकेतून बाहेर
ऑस्ट्रेलिया संघ भारताविरुद्ध आणि न्यूझीलंडविरुद्ध वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. या दोन्हीही मालिकेसाठी पॅट कमिन्सची संघात निवड करण्यात आली नाही. इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघाच्या कसोटी कर्णधाराला भारत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळेत पॅट कमिंस फिट होऊन अॅशेस मालिकेसाठी संघात कमबॅक करु शकतो. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही पॅट कमिन्सबाबत एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, तो भारत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडेल आणि अॅशेसच्या तयारीसाठी थेट मैदानात उतरेल.
१४ वर्षे जुनी दुखापत
पॅट कमिन्सला पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मार्च २०११ मध्ये शेफील्ड शिल्ड स्पर्धेत त्याला पहिल्यांदाच ही दुखापत झाली होती. त्यानंतर, पॅट कमिन्सला नोव्हेंबर २०१२, ऑगस्ट २०१३ आणि सप्टेंबर २०२३ मध्येही स्ट्रेस फ्रॅक्चरचा त्रास झाला आहे.
ऑस्ट्रेलिया संघाचे पुढील वेळापत्रक
ऑस्ट्रेलिया संघ १ ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळेल. त्यानंतर १९ ते २५ ऑक्टोबर दरम्यान भारताविरुद्ध ३ एकदिवसीय सामने खेळेल. तर २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान ५ टी-२० सामने खेळले जातील. त्याच वेळी, २१ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये इंग्लंडविरुद्ध अॅशेस मालिका सुरू होईल.