
दिग्गज क्रिकेटपटू अमित मिश्रा याची क्रिकेटमधून निवृत्ती
आंतरराष्ट्रीय क्रिकेट, आयपीएलमध्येही दमदार कामगिरी
सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये हजारहून अधिक विकेट
२५ वर्षांची कारकीर्द, आपल्या जादुई फिरकीनं प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला गिरकी घ्यायला लावणारा आणि कारकिर्दीत हजारांहून अधिक विकेट घेणाऱ्या अमित मिश्रानं (Amit Mishra Announces Retirement) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मिश्रानं गुरुवारी, ४ सप्टेंबरला ही घोषणा केली. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलसह भारताच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्येही तो खेळणार नाही. मात्र, जगातील अन्य टी २० लीगमध्ये खेळू शकतो.
भारताच्या दिग्गज गोलंदाजांपैकी (Indian Cricketer) एक म्हणजे अमित मिश्रा. त्यानं निवृत्ती घेण्याचं कारण सांगितलंय. हा निर्णय प्रामुख्यानं वारंवार जायबंदी होणे आणि युवा पिढीला मोठी संधी मिळावी यासाठी घेतला आहे. प्रसिद्धी पत्रकाद्वारे अमित मिश्राने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
अमित मिश्राने भारताकडून २२ कसोटी, ३६ वनडे आणि १० टी- ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांपासून आयपीएल स्पर्धेतही (IPL) त्यानं चमकदार कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे संघात असल्यामुळं त्याला फारशी संधी मिळाली नाही.
अमित मिश्रा यानं भारताकडून २२ कसोटी सामने खेळले असून, त्यात ७६ विकेट घेतल्या आहेत. त्याला ३६ वनडे सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली. त्यात त्यानं ६४ विकेट घेतल्या. याशिवाय टी २० मध्ये त्यानं १६ विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिश्राने एकूण तीन वेळा फाइव्ह विकेट हॉल घेतल्या आहेत. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये त्यानं जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यानं १५२ फर्स्ट क्लास सामन्यांत ५३५ विकेट घेतल्या. लिस्ट ए मध्ये २५२ आणि टी २० मध्ये २८५ विकेट घेतल्या आहेत. मिश्राने व्यावसायिक क्रिकेटमध्ये एकूण १०७२ विकेट घेतल्या आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यानं एक द्विशतकही झळकावलं आहे. त्याच्या नावावर ४ हजारांहून अधिक धावा आहेत.
इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलमध्येही अमित मिश्राचा जलवा बघायला मिळाला. दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपरजायंट्स, सनरायझर्स हैदराबाद, डेक्कन चार्जर्स या संघांचंही त्यानं प्रतिनिधीत्व केलंय. आयपीएल कारकीर्दीत त्यानं एकूण १७४ विकेट घेतल्या आहेत. मिश्राने आयपीएलमध्ये तीन वेळा हॅट्ट्रिक घेतली आहे. हा एक विक्रम त्याच्या नावावर आहे. आयपीएलमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट ७.३७ आहे. आयपीएलच्या तब्बल १५ पर्वात तो खेळला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.