
नुकतंच टीम इंडियाने एशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एशिया कपमध्येही आपलं वर्चस्व दाखवून दिलंय. यानंतर मुख्य कोच गौतम गंभीरचे सगळीकडे कौतुक होतंय. मात्र केवळ क्रिकेटच नाही तर गरजूंच्या मदतीसाठी देखील गंभीर पुढाकार घेत असतो.
माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी दिल्लीमध्ये ‘आशा जन रसोई’ या नावाने एक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश गरीब आणि गरजूंना अल्प दरात पौष्टिक आणि पोटभर अन्न उपलब्ध करून देणं हा आहे. या जन रसोईंची सुरुवात त्याने आपल्या खासदारकीच्या काळात केली होती. आज या रसोईंमधून हजारो लोकांना दररोज जेवण मिळतं.
गौतम गंभीर यांनी पहिली ‘आशा जन रसोई’ २४ डिसेंबर २०२० रोजी दिल्लीच्या गांधीनगर भागात सुरू केली. पूर्व दिल्लीहून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्याने हा उपक्रम सुरू केला होता. या माध्यमातून दररोज सुमारे १००० लोक जेवणासाठी येतात.
या उपक्रमाअंतर्गत एका थाळीत पुरेशा प्रमाणात भात, डाळ, भाजी आणि सॅलड देण्यात येतं. सर्वात विशेष म्हणजे, हे संपूर्ण जेवण फक्त १ रुपयामध्ये उपलब्ध असतं. ही रसोई कैलाश नगर, गांधीनगर, शाहदरामध्ये आहे आणि याचे जवळचे मेट्रो स्टेशन शाहदरा आहे.
पहिल्या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहता गौतम गंभीरने दुसरी जन रसोई ९ फेब्रुवारी २०२१ रोजी न्यू अशोक नगर भागात सुरू केली. या ठिकाणीही लोकं फक्त १ रुपयात पौष्टिक अन्नाचा आस्वाद घेऊ शकतात. या रसोईत दररोज १००० हून अधिक लोक जेवण करतात. ज्यामुळे या भागातील अनेक गरजूंना मोठा आधार मिळतो.
२४ ऑगस्ट २०२१ रोजी त्याने तिसरी जन रसोई आपल्या संसदीय क्षेत्रात म्हणजेच ईस्ट विनोद नगरमध्ये सुरु केली. या रसोईत एकावेळी ५० लोक जेवण करू शकतात. दुपारी १२ ते ३ या वेळेत येथे जेवण दिलं जातं. या रसोईतही फक्त १ रुपयात भरपेट जेवण मिळतं.
गौतम गंभीरने त्याची चौथी जन रसोई पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगर-शकरपूर भागात २३ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू केली. या केंद्रातही दररोज १००० हून अधिक लोक १ रुपयात जेवण करतात. एकावेळी ४० लोकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या उपक्रमातील पाचवी जन रसोई १४ जानेवारी २०२३ रोजी सुरू झाली. ही रसोई लक्ष्मी नगरच्या किशन कुंज भागात आहे. याठिकाणी देखील दररोज १००० लोकांना केवळ १ रुपयात भरपेट अन्न दिलं जातं. एकावेळी ५० लोक जेवण करू शकतील अशी या ठिकाणी सोय करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.