सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात चांगला पाऊस झाला. परंतु त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. मागील आठवडाभर कोणत्याही भागात मुसळधार पाऊस झाला नाही. त्यामुळे तापमानाचा पारा वाढला असून उन्हाचा चटका बसत आहे. अशातच ओढ दिलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. कारण, बंगालच्या किनारपट्टीवर तयार झालेला खोल दाब हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे. सोमवारी याचे रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे.
त्यामुळे महाराष्ट्रासहित २० राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुराच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळणार, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. तर झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि ईशान्येकडील अनेक भागांमध्ये येत्या २० सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय होणार असून मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरातही ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाच्या सरी कोसळणार आहे. पुण्यासह आजूबाजूच्या परिसरात देखील मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.
सध्या पश्चिम बंगालच्या गंगा किनारी प्रदेशावर आणि बांगलादेशच्या लगतच्या खोल दाबामुळे पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशाला पावसाने चांगलंच झोडपून काढलंय. अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. सोमवारीही या राज्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा हवामान खराब होण्याची शक्यता आहे. शिमला हवामान केंद्राने येत्या १८ सप्टेंबरपासून राज्यात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. कांगडा, कुल्लू, मंडी, शिमला, सोलन आणि सिरमौर जिल्ह्यात पावसामुळे परिस्थिती बिकट होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय. येत्या २१ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण राज्यात अशीच परिस्थिती राहू शकते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.