केरळच्या वायनाडमधील मेप्पाडीजवळ झालेल्या भूस्खलनातील मृतांचा आकडा वाढत चालला आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० जण अजूनही बेपत्ता आहे. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या २०० जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावर रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू आहे. पण मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे मदतकार्यामध्ये अडथळे येत आहेत. आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे घटनास्थळी भेट देणार आहेत.
केरळच्या वायनाड जिल्ह्यातील डोंगराळ भागामध्ये सोमवारी चार गावांमध्ये भूस्खलन झाले. या भूस्खलनामध्ये चारही गावं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. भूस्खलनामध्ये मुंडक्कई, चूरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या गावांमध्ये मोठं नुकसान झाले. या गावातील सर्व घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेकांची संपूर्ण कुटुंब या भूस्खलनात बेपत्ता झाले. या गावामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असून आपला माणूस वाचेल या आशेने ते त्याठिकाणी रडत बसले आहेत.
भूस्खलन झालेल्या ठिकाणावर एनडीआरएफ, लष्कराचे जवान, स्थानिक प्रशासनामार्फत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. ३ हजारांपेक्षा जास्त जण बचावकार्याचे काम करत आहेत. पण मुसळधार पाऊस, चिखल, झाडांचे मोठ-मोठे तुकडे, खराब हवामान यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. या घटनेनंतर चूरलमाला आणि मुंडक्कईमधील पूल पाण्यासोबत वाहून गेला. आता लष्कराचे जवान हा पूल बनवण्याचे काम करत आहे. जेणेकरून बचावकार्य वेगाने होईल.
दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी नवी दिल्लीहून वायनाडला रवाना झाले आहेत. ते त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तेथे पोहोचत आहेत. प्रियांका गांधीही त्यांच्यासोबत वायनाडला भेट देण्यासाठी आल्या आहेत. दोघेही बुधवारी वायनाडला जाणार होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांना वायनाड दौरा पुढे ढकलावा लागला. आज ते वायनाडला येऊन घटनास्थळाला भेट देणार आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.