केरळमधील वायनाडमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्याने मंगळवारी पहाटे दरड कोसळली. या दरडीमध्ये दबून आतापर्यंत १६३ जणांचा मृत्यू झाला असून अद्याप अजूनही अनेकजण बेपत्ता आहेत. घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरड कोसळलेल्या क्षेत्रात लष्कर, नौदल आणि एनडीआरएफच्या टीमकडून या ठिकाणी मदत मोहिम सुरूच आहे. दुर्घटनेतील जखमींवर उपचारांसाठी राज्यातील जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. राजकीय नेत्यांसोबतच आता कलाकार मंडळीही या दुर्घटनेवर प्रतिक्रिया देत आहेत.
अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, थलापती विजय यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मृतांच्या कुटुंबाप्रती सहानुभूती दाखवली आहे. 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदान्ना हिने इन्स्टा स्टोरी शेअर करत लिहिले की, "वायनडमध्ये झालेल्या भूस्खलनाची घटना पाहून माझं हृदय तुटलं. मला माफ करा, घडलेली घटना भीतीदायक आहे. कुटुंबाप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करते." शिवाय टॉलिवूड अभिनेता थलापती विजय यानेही एक इन्स्टा पोस्ट शेअर केली आहे.
त्याने एक्सवर वायनाड घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्याने पोस्टमध्ये लिहिले की, "वायनडमध्ये झालेल्या भूस्खलनाची घटना ऐकून दु:ख झाले आहे. कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहे. तिथल्या स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांकडे विनंती आहे की, त्यांनी पीडित कुटुंबीयांना आवश्यक मदत वेळेत पोहोचवावी."
पावसामुळे वायनाडच्या मेपाडी परिसरात दरड मध्यरात्रीच्या सुमारास पडली. ही घटना काल (३० जुलै) मध्यरात्री घडली. त्यावेळी तेथील स्थानिक रहिवाशी गाढ झोपेत होते. दरड कोसळलेल्या क्षेत्रात एनडीआरएफ आणि आपत्ती निवारण दलाचे जवान बचावकार्य करीत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.