

Aligarh Viral Video : ८० च्या दशकात एक मराठी चित्रपट सुपरहिट झाला होता. जावयाची जात. खरंतर 'जावयाची जात...' यावर एक म्हण सुद्धा प्रसिद्ध आहे. जावयाचा स्वभाव आणि त्याच्या विशिष्ट सवयी याबद्दल सांगताना ही म्हण वापरली जाते. अनेकदा घरात नवरा-बायकोची भांडणं होतात. मग नवरा त्याच्या बायकोला घरातून हाकलून देतो. हट्टी स्वभाव, रुबाब आणि कसला गर्व माहीत नाही, पण जावई तिला पुन्हा आणायलाही जात नाही. पण भलेबुरे जे घडून गेले...या गाण्याच्या ओळींप्रमाणे जावईही बदललेत. अशाच एका जावयाचा आणि सासूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सासू आणि जावयाचा हा व्हिडिओ बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. कारण तो जावई आपल्या सासूच्या पायावर अक्षरशः लोटांगण घालत आहे. सासूचे पाय धरतो आणि माझ्या बायकोला घरी पाठवा, अशी विनवणी करत असल्याचं व्हिडिओत दिसतंय. हा व्हायरल व्हिडिओ उत्तर प्रदेशातील अलीगढचा असल्याचं सांगण्यात येत आहे.
माहेरी गेलेल्या बायकोला पुन्हा आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी नवरा पोलीस ठाण्यात पोहोचला. माझ्या बायकोला घरी घेऊन जातो, असं तो गयावया करून सांगू लागला. पण बायकोच्या आईनं तिला सासरी पाठवण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. शेवटी त्यानं शेवटचा पर्याय म्हणून आपल्या सासूच्या पायावर लोटांगण घातलं. माझ्या बायकोला घरी पाठवा हो, असं तो विनवण्या करू लागला. पण रडवेल्या झालेल्या जावयाला सासूनं दयामाया दाखवली नाही. तेथून तडक निघून गेली. तिथंच असलेल्या कुण्या व्यक्तीनं हे सगळं दृश्य आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात टिपलं. आता हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मिळालेल्या माहितीनुसार, नवऱ्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी बायको आपल्या आईला घेऊन अलीगढच्या महिला पोलीस ठाण्यात पोहोचली होती. काही वेळानंतर नवरा देखील पोलीस ठाण्यात पोहोचला. तिथं नवरा-बायकोत चर्चा झाली. पण तिच्या आईनं आपल्या मुलीला नवऱ्यासोबत पाठवण्यास नकार दिला. त्यावर नवरा सासूच्या पाया पडू लागला. तिथंच धायमोकळून रडू लागला. माझ्या आई, तुमच्या मुलीची समजूत घाला, तिला माझ्यासोबत पाठवा, असं तो विनवण्या करू लागला. पण सासूने त्याचं काहीएक ऐकलं नाही आणि निघून गेली. त्यानंतर त्याच्या संयमाचा बांध सुटला. पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांच्या समोर त्यानं हात जोडले. मॅडम, माझी बायको मला मिळवून द्या, असं तो म्हणाला.
मीडिया रिपोर्टनुसार, तरुणाचं लग्न पिंजरी गावातील एका तरुणीशी झालं. त्यांना तीन मुलं आहेत. त्यातील एक आठ वर्षांचा मुलगा दिव्यांग आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी बायको त्याच्याकडून पैसे घ्यायची. पण ते पैसे उपचारासाठी खर्च करत नव्हती, असा आरोप या तरुणानं आपल्या बायकोवर केला. यावरून त्यांच्यात भांडणं होऊ लागली. तसेच आपला नवरा घरखर्चासाठी पैसे देत नाही, असं ती तिच्या माहेरच्या लोकांना सांगायची. ते ऐकून माहेरचे लोक संतापले. त्यांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच अनेकदा त्याला मारहाणही केली, असा दावा या तरुणाने केलाय. एकदा तर तिने आपल्या घरच्यांना बोलावून घेतले आणि त्याला मारहाण केली. घरातील दागिने घेऊन पसार झाली, असा आरोपही त्याने केला आहे. आता पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या असून, त्यांना पुढील तारीख दिली आहे. महिला पोलीस ठाण्यात या वादावर तोडगा निघणार आहे, असं सांगण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.