
दिल्लीमध्ये शनिवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये ९ महिला, ४ पुरुष आणि ५ मुलांचा समावेश आहे. मृतांमधील ९ जण बिहारमधील, ८ दिल्लीतील आणि एक हरियाणातील आहेत. महाकुंभला जाण्यापूर्वीच ही घटना घडली आणि अनेकांनी आपला जीव गमावला. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या अनेकांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. चेंगराचेंगरीची घटना घडण्यापूर्वी आणि नंतरचे मन हेलावून टाकणारे व्हिडीओ समोर आले आहेत.
दिल्ली रेल्वे स्थानकावर महाकुंभला जाण्यासाठी स्पेशल ट्रेन येताच एकच गोंधळ उडाला. गर्दी इतकी होती की ट्रेनमध्ये चढताना चेंगराचेंगरी झाली. ही घटना रात्री १० वाजताच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १३ आणि १४ वर घडली. घटनेच्या वेळी, प्रयागराज महाकुंभाला जाण्यासाठी हजारो भाविक स्टेशनवर जमले होते आणि ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. किंकाळ्या, आरडाओरडा अन् धावपळ झाली. अनेकांचे श्वास अडकले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
चेंगराचेंगरी होण्यापूर्वी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी इतकी होती की सगळीकडेच ट्रेनमध्ये चढण्यासाठी नागरिक प्रयत्न करत होते. गर्दीमध्ये अनेक महिला, लहान मुलं दबली गेली आणि त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे चेंगराचेंगरी झाल्यानंतर प्रवासी मृतावस्थेत पडल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. रेल्वे पुलाच्या पायऱ्यांवर, प्लॅटफॉर्मवर सगळीकडेच चपलांचे आणि कपड्यांचे खच दिसत आहे. गंभीर जखमी झालेले मदतीसाठी वाट पाहत असल्याचे दिसत आहे. मृतांचे नातलग त्याठिकाणी रडत बसल्याचे दिसत आहे. दिल्ली रेल्वे स्थानकावरील परिस्थिती खूपच गंभीर होती.
दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, दिल्लीचे उपराज्यपाल आणि अनेक विरोधी नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, सरकारने अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये, गंभीर जखमींना २.५ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुःख व्यक्त केले आहे. 'नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल ऐकून खूप दुःख झाले," असे राष्ट्रपती कार्यालयाने ट्विटरवर लिहिले. मी पीडित कुटुंबांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करते आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.