काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्ष सातत्याने देशात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करत आहे. यावरून सत्तापक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये संसदेतही अनेकदा आरोप-प्रत्यारोप होतानाही दिसलं. यातच आता जातनिहाय जनगणेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केरळमधील पलक्कड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) तीन दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठक सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर आरएसएसने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर म्हणाले की, '' 'जात हा आपल्या समाजातील संवेदनशील मुद्दा आहे. हाही देशाच्या एकात्मतेशी संबंधित प्रश्न आहे. त्यामुळे फक्त निवडणुका आणि राजकारण डोळ्यासमोर न ठेवता यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.''
ते म्हणाले, ''सरकारला आकडेवारी हवी आहे. समाजातील विशिष्ट जातीच्या लोकांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. या हेतूंसाठी ती (जातीची जनगणना) करण्यात यावी. याचा उपयोग लोककल्याणासाठी व्हायला हवा.''
संघाच्या बैठकीत पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरांसोबत घडलेल्या घटनेचा निषेधही करण्यात आला. ही त्यंत दुर्दैवी घटना असल्याचं संघाने म्हटलं आहे. अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना लवकरात लवकर न्याय देण्यासाठी कायदे आणि दंडात्मक कारवाईचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचं सुनील आंबेकर म्हणाले आहेत.
दरम्यान, जातनिहाय जनगणेवर संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र आता काँग्रेसने यावर टीका केली आहे. काँग्रेसने X वर पोस्ट करत म्हटलं आहे की, ''आरएसएसने जातनिहाय जनगणनेला उघड विरोध केला आहे. आरएसएस म्हणतो, जातीची जनगणना समाजासाठी चांगली नाही. भाजप आणि आरएसएसला जात जनगणना करायची नाही, हे या विधानावरून स्पष्ट होते. त्यांना दलित, मागासवर्गीय, आदिवासींना त्यांचे हक्क द्यायचा नाहीत. पण हे लिहून ठेवा ते ठेवा, जातनिहाय जनगणना होईल आणि काँग्रेस ती करणार.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.