

Ranchi Airport : झारखंडची राजधानी रांचीमध्ये मोठा विमान अपघात टळला आहे. रांची विमानतळावर इंडिगोचं विमान उतरत होते. त्याचवेळी विमानाचा मागचा काही भाग धावपट्टीवर आदळला. या विमानात ७० प्रवासी होते. धावपट्टीवर मागचा भाग आपटल्यानं विमानातील प्रवाशांना हादरा बसला. त्यामुळं काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. सुदैवानं यात कुणालाही इजा झाली नाही.
काही दिवसांपूर्वी 'इंडिगो'च्या विमानसेवेचा गोंधळ उडाला होता. हा गोंधळ निवळतो ना निवळतो तोच पुन्हा एक संकट इंडिगोवर कोसळलं होतं. पण सुदैवानं ते टळलं आहे. रांची विमानतळावर इंडिगोच्या विमानाचा अपघात होता-होता टळला. रांची विमानतळावर विमान उतरत असतानाच त्याचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला. विमानातील प्रवाशांना त्याचे हादरे जाणवले. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेनंतर विमानाचे पुढचे उड्डाण रद्द करण्यात आले.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही दुर्घटना शुक्रवारी संध्याकाळी साधारण साडेसात वाजताच्या सुमारास घडली. भुवनेश्वरवरून रांचीला आलेलं विमान एअरपोर्टवर उतरवण्यात येत होतं. या विमानात जवळपास ७० प्रवासी होते. रांची विमानतळाचे संचालक विनोद कुमार यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, लँडिंगवेळी विमानाचा मागचा भाग धावपट्टीला धडकला. प्रवाशांचा हादरा बसला असला तरी, सर्व जण सुरक्षित आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
या दुर्घटनेनंतर विमानाचं पुढचं उड्डाण रद्द करण्यात आलं. तांत्रिकदृष्ट्या हे विमान उड्डाणासाठी अक्षम असल्याचे निष्पन्न झाले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. रांचीहून भुवनेश्वरसाठीचे पुढचे उड्डाणही रद्द करण्यात आले. काही प्रवाशांनी प्रवास करणं टाळलं. तर इतर प्रवाशांनी पुढची वेळ निश्चित केली. काही प्रवाशांची रस्तेमार्गे भुवनेश्वरला पाठवण्याची व्यवस्था करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर शुक्रवारी, १२ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. त्यानंतर इंडिगो एअरलाइन आणि विमानतळ व्यवस्थापनानं चौकशी सुरू केली आहे. या घटनेमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. इंडिगोचं विमान ज्यावेळी उतरवलं जात होतं, तेव्हा रांचीमधलं हवामान कसं होतं, याचाही चौकशी दरम्यान विचार केला जात असल्याचे सांगितले जात आहे. तसेच रांची विमानतळावरील धावपट्टीची स्थिती आणि विमानात अन्य तांत्रिक कारण असू शकते का, याबाबतही चौकशी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.