
राजस्थानमधील जयपूर आणि सिकर हादरले
दोन वेगवेगळ्या कुटुंबातील आठ जणांची सामूहिक आत्महत्या
महिलेने चार मुलांसह आयुष्य संपवले
सामूहिक आत्महत्यांच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी राजस्थान हादरले. दोन कुटुंबातील आठ सदस्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. राजस्थानमधील जयपूर आणि सिकरमध्ये या घटना घडल्या. सिकर जिल्ह्यात एक महिलेने आपल्या चार मुलांसह आत्महत्या केली. तिचे पतीसोबत वाद सुरू होते. ती तीन मुले आणि एका मुलीसह एका फ्लॅटमध्ये राहत होते. या चौघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. तर जयपूरमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्या कुटुंबानं सामूहिक आत्महत्या केली. त्यात पती, पत्नी आणि मुलाचा समावेश आहे.
सिकर जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली. एका महिलेनं आपल्या चार मुलांसोबत आयुष्य संपवलं. या महिलेचे पतीसोबत खटके उडत होते. ती आपल्या चारही मुलांसोबत एका फ्लॅटमध्ये राहत होती. या पाच जणांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. विषारी पदार्थ खाऊन त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळावर विषाची १० पाकीटं मिळाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे पतीसोबत वाद सुरू होते. त्यामुळे ती आपल्या चार मुलांसह पालवास रोडवरील एका इमारतीत राहत होती. या पाचही जणांनी सामूहिक आत्महत्या केली. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी तपास सुरू केला आहे. या कुटुंबानं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, या पाचही जणांनी दोन ते तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी. त्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. फ्लॅटमधून दुर्गंधी सुटल्याने शेजारी राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, आतील दृश्य बघून सगळेच हादरले. फ्लॅट बऱ्याच दिवसांपासून बंद होता. त्यातून दुर्गंधी येत होती. दरवाजा तोडल्यानंतर पाच जणांचे मृतदेह आढळून आले. फ्लॅट एका आठवड्यापासून बंद होता, असे सांगण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
राजस्थानची राजधानी जयपूरच्या करणी विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी हृदयद्रावक घटना उघडकीस आली. एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिक आत्महत्या केली. मृतांमध्ये वडील, आई आणि मुलाचा समावेश आहे. घटनास्थळी इंग्रजीत लिहलेली चिठ्ठी सापडली. त्यात एका ओळखीच्या व्यक्तीनं त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. सकाळी आठ वाजेपर्यंत फ्लॅटचा दरवाजा बंद होता. कुटुंब प्रमुख असलेले रुपेंद्र शर्मा हे दररोज पहाटे पाच वाजता उठतात, पण घर आठ वाजेपर्यंत बंद असल्यानं घर मालक रामगोपाल शर्मा यांना संशय आला. त्यांनी शर्मा यांच्या नातेवाईकांना कळवलं. तसेच पोलिसांनाही माहिती दिली.
करणी विहार पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दरवाजा तोडला. आतमधलं दृश्य भयंकर होतं. तिघांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले होते. घराच्या दरवाजाजवळ मुलगा पुलकितचा मृतदेह आढळला. तर हॉलमध्ये रुपेंद्र शर्मा, तसेच खोलीत पत्नी सुशिला शर्मा यांचा मृतदेह होता. तिघांनीही विष पिऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून, त्यात एका ओळखीच्या व्यक्तीचा उल्लेख केला असून, त्याच्याकडून त्रास दिला जात असल्याचा उल्लेख त्यात आहे. त्याआधारे नातेवाइकांनी संबंधित व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.