

जयपूरमध्ये मजूरांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग
हाइटेंशन लाईनचा स्पर्श झाल्याने बसला आग
बसला आग लागून तीन मजूरांचा जागीच मृत्यू
दुर्घटनेत १२ जण गंभीर जखमी झाले
राजस्थानच्या जैसलमेरमध्ये धावत्या बसला आग लागून २८ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच राजस्थानमध्ये बसला आग लागल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. या आगीमध्ये बसमधील ३ प्रवाशांचा जिवंत जळून मृत्यू झाला तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तीन मृतांमध्ये बापलेकीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर ग्रामीण जिल्ह्याच्या शाहपूरा उपखंडच्या मनोहरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सकाळी ही घटना घडली. टोडी गावातील एका वीट भट्टीवर मजुरांना घेऊन बस जात होती. या बसला ११ हजार वोल्टच्या हाइटेन्शन लाइनचा स्पर्श झाला. क्षणात संपूर्ण बसमध्ये करंट उतरला आणि स्पार्क झाला. संपूर्ण बसला आग लागली. बघता बघता संपूर्ण बसला आगीने विळखा घातला. या आगीमध्ये बसमधील ३ मजूरांचा मृत्यू झाला. तर १२ मजूर गंभीर जखमी झाले.
प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, बसमधून उत्तर प्रदेशमधील मजूरांना कामासाठी वीट भट्टीवर आणले जात होते. वीट भट्टीला जाणाऱ्या दिशेला बसला हाइटेंशन लाइनचा स्पर्श झाला आणि मोठा स्फोट झाला. त्यानंतर बसला आग लागली. घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. बसमधील सर्व मजूर बचावासाठी जोरजोरात ओरडू लागले. त्यांचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. आगीमध्ये तिघांचा मृत्यू झाला. तर १२ जण गंभीर जखमी झाले. जखमींमधील ५ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी जयपूरला पाठवण्यात आले. ही घटना घडली त्यावेळी बसमध्ये ६० जण होते. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.