North India Rain Updates: बिपरजॉय चक्रीवादळामुळे यंदा मान्सूनला उशीर झाला असला, तरी देशभरात आता मान्सून सक्रीय झाला आहे. जुलै महिना सुरू होताच पावसाने थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. सध्या देशातील ८ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि पंजाबसह उत्तरेकडील राज्यांमध्ये रविवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार झाला. पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून विविध ठिकाणी झालेलं भूस्खलन आणि दरडी कोसळल्यामुळे आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे.
हिमाचल प्रदेशात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने नद्यांनी रौद्ररूप धारण केले होते. रविवारी हिमाचलमधील ७ शहरांना अतिवृष्टीचा इशारा (Rain Alert) देण्यात आला होता. हिमाचलमध्ये मागील ३६ तासांत भूस्खलनाच्या १४ घटना घडल्या असून १३ ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे सुमारे ७०० रस्ते बंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
त्याचप्रमाणे मनाली येथे पूरसदृश स्थितीमुळे काही दुकाने वाहून गेली आहेत, तर कुलूसह काही शहरांत आलेल्या पुरामुळे वाहने वाहून गेल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. दरम्यान, उत्तराखंड मधील ऋषीकेश-बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भूस्खलनामुले भाविकांची कार दरीत कोसळल्याने ३ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे राजधानी दिल्ली आणि गुरुग्रामसह उत्तरेकडील राज्यांतील अनेक शहरांना रविवारी मुसळधार पावसाने झोडपून काढलं. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं असून अनेक वाहने अडकून पडली आहेत. रेल्वेच्या वाहतुकीवर देखील मुसळधार पावसाचा परिणाम झाला आहे. रविवारी १७ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या, तर १२ रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. अनेक ठिकाणी शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, येत्या २४ तासांत पावसाचा जोर (Weather Updates) आणखी वाढणार असून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या २४ तासांत दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.