लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून अनेक राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे केंद्रातील मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी INDIA आघाडीची मोट बांधली आहे. एकीकडे भाजपने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असताना, दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी सत्तेत आल्यास देशातील ९ लाख ६४ हजार रिक्त पदांची भरती करून तरुणांना रोजगार देऊ, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली आहे. आपल्या अधिकृत X अकाउंटवरून (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत राहुल गांधींनी ही घोषणा केली आहे. (Latest Marathi News)
"देशातील तरुणांनो, एक गोष्ट लक्षात घ्या! नरेंद्र मोदी यांचा रोजगार देण्याचा हेतू नाही. नवीन पदे निर्माण करणे तर दूरच, केंद्र सरकारच्या रिक्त पदांवरही ते बसले आहेत. केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीचा विचार केला, तर ७८ विभागांमध्ये ९ लाख ६४ हजार पदे रिक्त आहेत", असं राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.
"महत्त्वाच्या खात्यांवर नजर टाकली, तर रेल्वेत २.९३ लाख, गृह मंत्रालयात १.४३ लाख आणि संरक्षण मंत्रालयात २.६४ लाख पदे रिक्त आहेत. १५ प्रमुख विभागांमध्ये ३० टक्यांपेक्षा जास्त पदे का रिक्त आहेत याचे उत्तर केंद्र सरकारकडे आहे का?", असा सवालही राहुल गांधींनी आपल्या पोस्टमधून विचारला आहे.
"खोट्या हमींची पोती' घेऊन फिरणाऱ्या पंतप्रधानांच्याच कार्यालयात मोठ्या प्रमाणात अत्यंत महत्त्वाची पदे का रिक्त आहेत? कायमस्वरूपी नोकऱ्या देणे हे ओझे समजणारे भाजप सरकार सातत्याने कंत्राटी पद्धतीला प्रोत्साहन देत आहे, जिथे ना सुरक्षा, ना सन्मान", अशी टीका देखील राहुल गांधी यांनी केली.
"रिक्त पदे हा देशातील तरुणांचा हक्क असून त्या भरण्यासाठी आम्ही ठोस योजना तयार केली आहे. भारताचा संकल्प आहे की आम्ही तरुणांसाठी नोकऱ्यांचे बंद दरवाजे उघडू. बेरोजगारीचा काळोख फोडून तरुणांचे नशीब उगवणार आहे", असे आश्वासन राहुल गांधी यांनी देशातील तरुणांना दिलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.