ऑपरेशन सिंदूरवर आज चर्चा, अधिवेशन तापणार; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होणार | Operation Sindoor
आजपासून लोकसभेत पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर १६ तास चर्चा.
राजनाथ सिंह आणि नरेंद्र मोदी सहभागी होणार.
काँग्रेसकडून व्हीप जारी खासदारांना उपस्थिती बंधनकारक.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा.
आज लोकसभेत पहलगाम दहतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा होणार आहे. दुपारी १२ वाजता ही चर्चा सुरू होईल. सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह या चर्चेला सुरूवात करतील. मिळालेल्या माहितीनुसार, या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी होतील. या विषयावर सुमारे १६ तास चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या चर्चेपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सीडीएस जनरल अनिल चौहान, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि तिन्ही दलातील सैन्याच्या प्रमुखांसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
काँग्रेसनं जारी केला व्हीप
दरम्यान, काँग्रेसनं त्यांच्या लोकसभा खासदारांसाठी व्हीप जारी केला आहे. ज्यामध्ये त्यांना सोमवारपासून तीन दिवस सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. काँग्रेसनं जारी केलेल्या व्हीपनुसार, लोकसभा खासदारांना सभागृहात उपस्थित राहणे अनिवार्य आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा गोंधळाने भरलेला होता. बहुतांश वेळ बिहारमधील मतदार यादीच्या चर्चेमध्ये गेला.
परंतु, आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, तसेच इतर नेते ऑपरेशन सिंदूर या मुद्द्यावरून सरकारला घेरतील.
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सहमती
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी २५ जुलै रोजी सांगितले की, सोमवारी लोकसभेत आणि मंगळवारी राज्यसभेत पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सहमती दर्शवण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी प्रत्येक सभागृहात १६ तास चर्चेसाठी सहमती दर्शवली आहे.
या चर्चेदरम्यान, ७ पक्षांचे शिष्टमंडळाचे सदस्य देखील ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी उभे केले जातील अशी शक्यता आहे. यामध्ये विविध नेत्यांचा समावेश आहे.
लष्करी कारवाईत १०० हून अधिक दशतवादी ठार
पहलगाम दशतवादी हल्ल्यानंतर, भारतीय सैन्यानं ६-७ मेच्या रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला होता. या लष्करी कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.