संसदेतील लोकसभा सभागृहात शून्य प्रहरादरम्यान दोन तरुणांनी सुरक्षा भेदत प्रेक्षक गॅलरीत प्रवेश केला आणि धुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर संपूर्ण देश हादरला. या तरुणांनी फेसबूकच्या माध्यमातून एकत्र येत संसदेत अशा प्रकारचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. यात महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील अमोल शिंदे हा तरुणही सामील होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यांची माहिती मिळताच त्याच्या आई-वडिलांना धक्का बसला आहे. यातून सावरत नाहीत तोच चौकशीसाठी पोलीस त्यांच्या घरी धडकले आणि घाबरलेल्या या कुटुंबाला अश्रू अनावर झाले. दरम्यान गेल्या २४ तासात अमोलशी संपर्क न झाल्यामुळे मुलाच्या काळजीने त्यांचा जीव कासावीस झाला आहे.
अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील झरी (बु) गावचा रहिवासी आहे. अमोल शिंदेच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. त्याचे आई-वडील गावातच मोलमजूरी करतात. मध्यंतरी तो देखील गावातच अधून मधून मजुरी करायचा. मात्र गेल्या काही दिवसांपासून अमोलचे बाहेरगावचे दौरे वाढले होते. याचदरम्यान तो 6 महिन्यात 3 वेळा दिल्लीला जाऊन आल्याची माहिती त्याच्या आई- वडिलांनी दिली आहे.
अमोल शिंदे हा गेल्या अनेक वर्षापासून आर्मीच्या भरतीसाठी प्रयत्न करत होता. मात्र या प्रयत्नात त्याचं आर्मी भरतीचं वय निघून गेलं. त्यामुळे तो पोलीस भरतीकडे वळला होता. त्यांची तयारीही जोरात सुरू होती. दरम्यान अमोलने संसदेत घुसखोरी केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत पोलीस अमोलच्या आई-वडिलांची चौकशी करत होते. दरम्यान आज देखील पोलिसांनी त्याच्या वडिलांना गावाबाहेर पडण्यासाठी बंदी घातली आहे. तर अमोलशी गेल्या 24 तासापासून संपर्क न झाल्यामुळे त्यांचा जीव कासावीस झाला आहे. पत्रकारांशी बोलताना ते भावूक झाले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बुधवारी अटक करण्यात आलेले जारही तरुण जवळपास दीड वर्षांपूर्वी फेसबूकवर भेटले होते. आझाद भगतसींग नावाच्या ग्रुपच्या माध्यमातून ते एकत्र आले होते. यातील पाचव्या संशयिताला गुडगाव येथील निवासस्थानातून उचलण्यात आले आहे. तर ललित झा नावाचा आणखी एकजण फरार आहे. लोकसभेच्या गॅलरीतून सभागृहात उड्या मारून धुराच्या नळकांच्या फोडणारे मनोरंजम डी, सागर शर्मा आणि संसदेबाहेर धुराच्या नळकांड्या फोडणारी नीलम आझाद आणि अमोल शिंदे काही दिवसांपूर्वी स्वतंत्रपणे राजधानी दिल्लीत दाखल झाले होते. ललित झा हाच त्यांना त्याचा मित्र विकीच्या घरी घेउन गेला होता. या सर्वांनी संसदेत अशा प्रकारच्या कट रचण्याची तयारी मागच्या जानेवारीमध्ये सुरू केली होती. तसेच पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेला भेट दिल्यानंतर संसद परिसराची रेकी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान संसदभवन परिसर घटनेतील आरोपींना थोड्याच वेळात कोर्टात हजर केले जाणार आहे. चारही आरोपींना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात येणार असून कोर्ट परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.