
मुस्लीम आहात का? अशी विचारणा करून निर्दयीपणे पर्यटकांवर बेछूट गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांचा क्रूर चेहरा जगासमोर आला आहे. जम्मू - काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या कर्नाटकातील एका कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळला. शिवमोगातील पर्यटकाला त्याच्या पत्नीच्या डोळ्यांदेखत दहशतवाद्यांनी क्रूरपणे संपवलं. या हल्ल्यातून बचावलेल्या त्याच्या पत्नीनं हा सगळा प्रसंग कथन केला. तिचा आक्रोश काळीज चिरणारा होता.
पहलगाममध्ये आज, मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांच्या एका गटानं पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत २० पेक्षा अधिक पर्यटकांनी जीव गमावला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. कर्नाटकातील शिवमोगा येथून जम्मू-काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या एका कुटुंबावरही दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला. मंजूनाथ असं या पर्यटकाचं नाव आहे. ते पत्नी पल्लवी आणि मुलासोबत जम्मू-काश्मीरला फिरायला गेले होते.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मंजूनाथ यांची पत्नी पल्लवी यांनी या दहशतवादी हल्ल्याचा थरकाप उडवणारा प्रसंग कथन केला. आम्ही तिघे म्हणजे मी, पती आणि आमचा मुलगा तिघेही काश्मीर फिरायला गेलो होतो. साधारण दुपारचे दीड वाजले असतील. आम्ही त्यावेळी पहलगाममध्ये होतो. अचानक एका गटानं गोळ्या झाडायला सुरुवात केली. माझ्या नवरा माझ्या डोळ्यांसमोर मरण पावला. हे सगळं माझ्यासाठी दुस्वप्न आहे, असं पल्लवी यांनी सांगितलं.
हल्ल्यानंतर काही स्थानिक माझ्या मदतीसाठी धावले. तीन जणांनी मला वाचवलं, असंही पल्लवी यांनी सांगितलं. पल्लवी यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोर हे हिंदूंना टार्गेट करत असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसत होते. तीन ते चार जणांनी आमच्यावर हल्ला केला. माझ्या पतीची गोळ्या झाडून हत्या केली. माझ्या डोळ्यांदेखत त्यांनी जीव सोडला. तुम्ही माझ्या नवऱ्याला आधीच मारलं आहे. मलाही मारून टाका, असं मी त्यांना सांगितलं. त्यावर आम्ही तुला मारू शकत नाही. जा, जाऊन मोदींना सांग, असं त्यातील एक हल्लेखोर म्हणाला.
माझ्या पतीचा मृतदेह शक्य होईल तितक्या लवकर कर्नाटकातील शिवमोगा येथे पाठवण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती पल्लवी यांनी स्थानिक प्रशासनाला केली आहे. दरम्यान, या हल्ल्याच्या घटनेचा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दारामय्या यांनी निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यातील पीडितांमध्ये कर्नाटकातील नागरिकही आहेत. आम्हाला या घटनेची माहिती मिळताच, तात्काळ बैठक बोलावली आहे. मुख्य सचिव आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. आम्ही अगदी बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आवश्यक ती मदत देण्यासाठी तत्पर आहोत. जे पीडित आहेत, हे सरकार म्हणून आम्ही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.