

नेपाळची चीनसारखीच तिरकी चाल
भारताच्या तीन भूभागांवर केला दावा
१०० रुपयांच्या चलनी नोटेवर मानचित्र
भारताचा आक्षेप, ठणकावून सांगितलं
विशाल आणि बलाढ्य अशी जगाच्या नकाशावर ओळख असलेल्या भारताच्या तुलनेत टीचभर असलेल्या नेपाळनं पुन्हा बेटकुळ्या फुगवून दाखवायला सुरुवात केली आहे. भारतासोबत पुन्हा पंगा घेण्याची हिंमत नेपाळनं दाखवली आहे. गुण नाही पण वाण लागला या म्हणीप्रमाणं नेपाळ्यांनी चीनसारखं वाकडं पाऊल टाकलंय. नेपाळनं आपल्या १०० रुपयांच्या नव्या चलनी नोटेवर छपाई केलेल्या नकाशात भारताचे तीन भूभाग दाखवले आणि ते आपले असल्याचा दावा केला आहे. यावरून नवा वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत.
नेपाळच्या या अजब कृतीनं भारतासोबतचा निवळलेला तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेपाळच्या केंद्रीय बँकेनं गुरुवारी १०० रुपयांची नोट चलनात आणली. त्यामध्ये देशाचे सुधारित राजनैतिक मानचित्र छापण्यात आले आहे. १०० रुपयांच्या चलनी नोटेवर छापलेल्या मानचित्रात नेपाळने कालापानी, लिपुलेख आणि लिंपीयाधुरा आदी भूभाग आपल्या देशाचाच भाग आहे अशा स्वरूपात दाखवलं आहे.
आपली 'उंची' किती? आपण करतोय काय? अशी अवस्था असलेल्या नेपाळला भारतानं त्यांची योग्य जागा दाखवली आहे. नेपाळचं हे पाऊल एकतर्फी आणि कृत्रिम क्षेत्रीय विस्तार असल्याचं भारतानं म्हटलं आहे. नेपाळ राष्ट्र बँक अर्थात एनआरबीद्वारे जारी केलेल्या नव्या नोटेवर माजी गव्हर्नर डॉ. महाप्रसाद अधिकारी यांची स्वाक्षरी आहे. तर तिथी विक्रम सवंत 2081 (2024 ईस्वी) अशी आहे.
तत्कालीन पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वातील सरकारने मे २०२० मध्ये संसदेत संविधान सुधारणा मंजूर करून कालापानी, लिपुलेख आणि लिंपीयाधुरा हे भूभाग आपल्या देशात समाविष्ट करून नव्या मानचित्राला अधिकृत मान्यता दिली होती. तेच सुधारित मानचित्र आता १०० रुपयांच्या नव्या चलनी नोटेवर छापण्यात आले आहे.
माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या कृतीचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. याच ओलींना अलीकडेच तरुणाईच्या आंदोलनानंतर पायउतार व्हावं लागलं होतं. नेपाळच्या नोटांपैकी फक्त १०० रुपयांच्या नोटेवरच देशाचं मानचित्र छापलं जातं. ५, १०, २०, ५०, ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांवर मानचित्र नसतं, असं एनआरबीचे प्रवक्ता गुणाकर भट्ट यांनी स्पष्ट केलं आहे. जुन्या १०० रुपयांच्या नोटेवर सुद्धा हेच मानचित्र होतं. आताच्या सरकारच्या नवीन निर्णयानुसार ते अपडेट करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.
भारतानं नेपाळच्या या कृतीवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. लिपुलेख, कालापानी आणि लिंपीयाधुरा हे अविभाज्य भाग आहेत आणि नेपाळनं उचललेलं हे पाऊल अत्यंत चुकीचं आणि अस्वीकारार्ह आहे, असं भारतानं ठणकावून सांगितलंय. दरम्यान, नेपाळची सीमा भारताची पाच राज्ये सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यांना लागून आहे. काही भूभागांवरून या दोन देशांमध्ये बऱ्याच काळापासून सीमावाद सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.