

इथियोपियामध्ये १० हजार वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक झाला. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर आकाशात जवळपास १० ते १५ किलोमीटर उंच राखेचे कण पसरले. उद्रेकानंतर कन्नूरहून अबुधाबीला जाणारे इंडिगोचे विमान अहमदाबादकडे वळवण्यात आले. या भागात घडलेली ही घटना इतिहासातील असाधारण घटनांपैकी एक असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर राखेचे कण उत्तर भारताकडे वेगाने पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
इंडिगो एअरलाइन्सच्या माहितीनुसार, कन्नूरहून अबुधाबीला जाणारे इंडिगोचे 6E 1433 हे विमान अहमदाबादकडे वळवण्यात आले आहे. सर्व प्रवासी आणि केबिन क्रू सुरक्षितरित्या अहमदाबादमध्ये उतरले आहेत. प्रवाशांना कन्नूरला परत जाण्यासाठी विशेष विमान सेवा देण्यात येईल. सर्व प्रवाशांनी संयम बाळगावा, अशी विनंती कंपनीने केली आहे.
दरम्यान, काही विमान सेवांचा मार्ग आधीच बदलण्यात आला आहे. राखेच्या कणांच्या तयार झालेल्या ढगांमुळं मोठं नुकसान होऊ शकतं, असे सांगण्यात येत आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर उडालेल्या राखेचे कण विमानाच्या इंजिनाला धोकादायक ठरू शकतात. त्यामुळेच सर्व यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे.
अकासा एअरने एक अॅडव्हायझरी जारी केली आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक प्रोटोकॉलनुसार, ज्वालामुखीच्या घटनेवर बारीक लक्ष ठेवून आहोत. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य आहे, असेही त्यात म्हटले आहे.
इथियोपियाच्या अफार भागात हायली गुबी ज्वालामुखीच्या क्षेत्रात तब्बल १० हजार वर्षांनंतर पहिल्यांदाच रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर उडालेल्या राखेचे कण हे भारताच्या उत्तरेकडे वेगाने पसरत आहेत. त्यामुळं भारताच्या डीजेसीए आणि विमान वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्यांनी सोमवारी संध्याकाळपासून दिल्ली आणि जयपूरच्या विमान वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.
टुलूज ज्वालामुखी राख सल्लागार केंद्राद्वारे उपग्रहाद्वारे केलेल्या निरीक्षणानुसार, ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर उडालेले राखेचे कण अवकाशात साधारण १० ते १५ किलोमीटर उंच उडाले आणि लाल महासागराच्या पलीकडे पूर्वेकडे वाहून गेले. टुलूज व्होल्कॅनिक अॅश अडव्हायझरी सेंटरच्या उपग्रहाद्वारे केलेल्या निरीक्षणातून माहिती मिळाली की, राखेचे कण लाल महासागराच्या पलीकडे जाऊन यमन आणि ओमानपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे यमन आणि ओमानमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
खलीज टाइम्सच्या वृत्तानुसार, ओमानच्या पर्यावरण प्राधिकरणानं ज्वालामुखीमुळं उडालेल्या राखेमुळं होणारे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन सतर्कतेचा इशारा दिला आहे. मात्र, ६८ केंद्रांवर अद्याप प्रदूषणाच्या पातळीत कोणतीही वाढ झालेली दिसून आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.