
भारताचे १४ वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग हे गेल्या काही दिवसांपासून आजारीच होते. वयोमानानुसार त्यांना वेगवेगळे आजार झाले होते आणि त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. देशाला पुढे नेण्यासाठी मनमोहन सिंग यांचे मोलाचे योगदान आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री आणि पंतप्रधान अशा भूमिकांमधून त्यांनी आपला ठसा उमटवला. एक विचारवंत आणि अभ्यासक म्हणून ते ओळखले जात होते. त्यांचा कामाप्रती असलेला व्यासंगी आणि शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता आणि विनम्र आचरणामुळे त्यांच्याकडे आदराने बघितले जात होते.
मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेडे गावामध्ये झाला होता. मनमोहन सिंग यांनी १९४८ साली पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले. १९५७ साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली .
त्यानंतर १९६२ साली मनमोहन सिंग यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी फील संपादन केली. त्यांचे ‘इंडियाज एक्स्पोर्ट ट्रेंड्स अन्ड प्रोस्पेक्ट्स फोर सेल्फ ससटेन्ड ग्रोथ’ हे पुस्तक भारताच्या अंतस्थ व्यापारी धोरणाची समीक्षा करणारे आहे.
पंजाब विद्यापीठ आणि प्रथितयश दिल्ली स्कूल ऑफ इकोनोमिक्सेमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असताना मनमोहन सिंग यांची शैक्षणिक ओळख अधिक समृद्ध झाली. या काळात युएनसीटीएडी सचिवालयात त्यांनी काही काळ काम केले होते. त्यातूनच त्यांची १०७ आणि १९९० या काळात जीनिव्हा येथील साउथ कमिशनच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली.
मनमोग सिंग यांनी १९७१ साली वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि त्यांचा सरकारमध्ये प्रवेश झाला. त्यातूनच १९७१ मध्ये त्यांची अर्थमंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. डॉ. सिंग यांनी अर्थमंत्रालयात भूषविलेल्या अनेक महत्वाच्या पदांमध्ये अर्थ मंत्रालयाचे सचिवपद , नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद, पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष पदांवर काम त्यांनी केले. १९९१ ते १९९६ या कालावधीत ते देशाचे अर्थमंत्री होते. भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम त्यांनी केले.
मनमोहन सिंग यांना पद्मविभूषण पुरस्कार(१९८७), जवाहरलाल नेहरू जन्म शताब्दी सन्मान(१९९५), आशिया मनी अवार्ड (१९९३ आणि १९९४), केम्ब्रिज विद्यापीठाचा अॅडम स्मिथ पुरस्कार (१९५६), केम्ब्रिजमधील सेंट जॉन महाविद्यालयात उल्लेखनीय कार्याबद्दल राईट अवॉर्ड या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. केम्ब्रिज आणि ऑक्सफोर्ड सारख्या अनेक विद्यापीठांकडूनही मनमोहन सिंग यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे.
मनमोहन सिंग यांनी १९९१ पासून राज्यसभा या वरिष्ठ सभागृहात खासदारपद भूषविले होते. १९९८-२००४ या कालावधीत त्यांनी राज्यसभेत विरोधी पक्ष नेत्याची भूमिकाही पार पडली होती. २२ मे २००४ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकानंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि ११ मे २००९ मध्ये ते दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाल होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.